Headlines

कुठे नेऊन ठेवलाय माझा जळगाव जिल्हा?:गुन्हेगारी, वाळू माफिया व दरोडेखोरांच्या सुळसुळाटावर रोहिणी खडसेंचा तीव्र संताप




वरणगावजवळील फुलगाव उड्डाणपुलाखालील बायपास रस्त्यावर एका 28 वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आल्याची गंभीर घटना रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारवर तसेच जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या गुन्हेगारी घटनांवरून टीका केली आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या, कुठे नेऊन ठेवलाय माझा जळगाव जिल्हा? गेल्या काही दिवसांमध्ये जर जळगाव जिल्ह्यामधल्या घटना बघितल्या, तर भोकर सारख्या ठिकाणी दरोडेखोर येतात, दरोडेखोर तिथल्या स्थानिक नागरिकांना धमकावतात, तिथे दरोडा टाकतात आणि शेवटी स्थानिक नागरिक त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडून नेतात आणि पोलिसांच्या हवाली करतात. आणि अशा घटनेनंतर पोलिस स्वतःचीच पाठ थोपटून घेतात की हो आम्ही त्या दरोडेखोरांना पकडलं. शेतकऱ्याची हत्या.. पुढे बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या, हेच कमी की काय, तर काल फुलगाव सारख्या ठिकाणी एका तरुणावरती गोळीबार केला जातो, त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला जातो. तेच कमी की काय, तर अजून अमळनेर तालुक्यातल्या नांद्रा या गावातल्या शेतकऱ्याने बेकायदेशीर चालू असलेल्या रेतीला विरोध करण्याचा प्रयत्न केला, पोलिस स्टेशनला जाऊन त्यांनी तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला की हे वाळू माफिया मला धमकावतायत की तुझा जीव घेण्यात येईल, तुला ठार करण्यात येईल. हे केल्यानंतरही फक्त साधी एनसी नोंदवली जाते, पण एफआयआर नोंदवली जात नाही. पोलिसांकडून एवढ्या धमक्या मिळत असतानाही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. शेवटी त्या शेतकरी बांधवाला काल रेती माफियांनी अक्षरशः डंपरच्या खाली, रस्त्यावरती डंपरच्या खाली घेऊन चिरडलं, त्याचा जीव गेला, त्याची हत्या करण्यात आली. जिल्ह्यात बेकायदेशीर वाहतूक सुरू हे डंपर हरियाणा पासिंगचं आहे. म्हणजे आरटीओ विभागाच्या नाकाखाली हरियाणा पासिंगचे डंपर इथे येऊन रेतीची सर्रासपणे बेकायदेशीर वाहतूक करतायत, ज्या डंपरना नंबर प्लेट नाही अशेही डंपर सर्रासपणे जळगाव जिल्ह्यामध्ये चालतायत. हे वाळू माफिया, जे जळगाव जिल्ह्यात आज रेती वाहतूक करतायत, हे काय सरकारचे जावई आहेत का? की तुम्ही त्यांना एवढं पाठबळ देताय? असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे. तसेच एवढी त्यांना हिम्मत होतेच कशी? तुमच्या सगळ्या पोलिस प्रशासनाच्या, आरटीओ विभागाच्या, तुमच्या सरकारच्या पाठबळाशिवाय हे शक्य नाही, असा आरोप खडसे यांनी केला आहे. चार मंत्री असूनही जिल्ह्यात नागरिकांचा जीव धोक्यात रोहिणी खडसे म्हणाल्या, दुर्दैव आहे खरं जळगाव जिल्ह्याचं, की जळगाव जिल्ह्यामध्ये जर प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदार बघितला तर हा महायुतीचा आहे. सरकारी पक्षाचे तुम्ही आमदार, खासदार आहात. चार-चार मंत्री आमच्या जळगाव जिल्ह्याला लाभलेले आहेत, पण इथल्या नागरिकांचा जीव धोक्यात आहे. आज एक सामान्य नागरिक जर रस्त्यावरती येत असेल, आणि रस्त्यावरती उभा राहिला, तर माहित नाही त्याला उद्या गोळीबार त्याच्यावरती होऊ शकतो, त्याला डंपरने चिरडलं जाऊ शकतं, त्याच्या अंगावर गाड्या घातल्या जाऊ शकतात, त्याला दरोडेखोर पकडून नेऊ शकतात. काही सांगता येत नाही जळगाव जिल्ह्यामधल्या आपल्या सामान्य नागरिकांच्या जीवाचं. हे जे गुंड आहेत, हे सरकारचे जावईच आहेत का? शेवटी वाळू माफिया, किंवा हे दरोडेखोर, किंवा हे जे गुंड आहेत, हे सरकारचे जावईच आहेत का काय, असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण प्रशासन यांना पाठीशी घालण्याचं काम करतंय. आपला जीव हा धोक्यात आहे. जळगाव जिल्ह्यात शेवटी काय चाललंय? हेच आपल्याला म्हणावं लागेल, अशी खंत रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *