Headlines

विश्वास नांगरे पाटलांच्या नावे 'डिजिटल अरेस्ट'चा बनाव:नागपुरात 1 कोटी 4 लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या सायबर सेलची तातडीची कारवाई




नागपूरच्या दीनदयाल भागात राहणाऱ्या प्रवीरकुमार तालुकदार यांना एका अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आला. भामट्यांनी थेट नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा फोटो आणि आवाजाचा वापर करून त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याची भीती दाखवली. त्यानंतर एनआयएचे अधिकारी प्रदीप जैस्वाल यांच्या नावाने धमकावून त्यांच्याकडून आरटीजीएसद्वारे तब्बल 1 कोटी 4 लाख रुपये उकळले. पोलिस आयुक्तांच्याच नावे एवढी मोठी फसवणूक झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकाराची गंभीर दखल घेत नागपूर गुन्हे शाखेचे सायबर सेल तात्काळ ॲक्शन मोडवर आले. पोलिसांनी तांत्रिक तपासाची चक्रे फिरवत उत्तर प्रदेश गाठले आणि दिनेश अवाभाई रावरीया तसेच अरविंद कानजी गाला या दोन भामट्यांना बेड्या ठोकल्या. पुलाखाली सापडले जिवंत काडतूस तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी गावात एका रस्त्यालगत असलेल्या पुलाखाली तब्बल 102 काडतुसे सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेल्या या साठ्यामध्ये 52 जिवंत गोळ्या आणि 50 रिकाम्या पुंगळ्यांचा समावेश आहे. ऑर्डिनन्स फॅक्टरीतील गोळ्यांचा तपास धक्कादायक बाब म्हणजे, या सर्व गोळ्या देशातील विविध ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये तयार झाल्याचे समोर आले आहे. यात महाराष्ट्रातील वरणगाव आणि खडकी, तसेच मध्य प्रदेशातील खमरिया ऑर्डिनन्स फॅक्टरीचा समावेश आहे. वेगवेगळ्या काळात आणि ठिकाणी तयार झालेल्या एवढ्या गोळ्या भारसिंगी गावात कुणी आणि कशा आणल्या, याचा कसून तपास आता पोलिस करत आहेत. सराफांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावे धमकी दरम्यान, नागपूरच्या इतवारी भागातील 8 सराफ व्यापाऱ्यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीचे पत्र आल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही सर्व पत्रे नागपूरच्याच खामला भागातून पोस्टाद्वारे पाठवण्यात आल्याचे उघड झाले आहे. 10 लाखांची खंडणी अन् जीवे मारण्याची धमकी याआधी 15 सप्टेंबरलाही राणाप्रताप नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका व्यापाऱ्याला असेच पत्र आले होते. त्यानंतर 31 ऑक्टोबरला आलेल्या नव्या पत्रात प्रत्येक व्यापाऱ्याकडे 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. पैसे न दिल्यास ‘टायगर श्रॉफ’सारखा जीवानिशी हल्ला करू, अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. सराफ बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या सर्व प्रकारानंतर सराफ व्यापाऱ्यांनी पोलिसांची भेट घेत सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. तहसील पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला लवकरच अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या इतवारी सराफ मार्केट परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *