![]()
राज्यातील राजकीय घडामोडींवर आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच शिवसेनेतील (शिंदे गट) अंतर्गत राजकारणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सडकून टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी नुकत्याच झालेल्या अजित पवार गटाच्या नेत्यांच्या भेटीचा संदर्भ देत राऊत यांनी, “हे मूळ पक्ष नसून महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी अमित शहांनी निर्माण केलेले गट आहेत, आणि भविष्यात हे दोन्ही पक्ष अमित शहा पूर्णपणे नष्ट करणार आहेत,” असा मोठा दावा केला आहे. ‘तुम्हाला पाय नाहीत, फक्त गुडघे आहेत’: अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाच्या नेतृत्वावर टीका करताना राऊत म्हणाले, “सध्या अजित पवार गटाचे नेतृत्व सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार करत आहेत. तर एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव त्यांच्या पक्षाचे नेतृत्व करत आहेत. प्रफुल्ल पटेल, तटकरे, हसन मुश्रीफ, उदय सामंत, दादा भुसे यांच्यासारखे लोक त्यांच्या हाताखाली काम करत आहेत. हे मूळ पक्ष नाहीत. अमित शहांनी महाराष्ट्र दुबळा करण्यासाठी हे फोर्सेस निर्माण केले आहेत. त्याच्यामुळे ते अमित शहाच्याच चरणाशी जाणार.” ते पुढे म्हणाले, “हा पक्ष तुम्ही चालवू शकत नाही. तेवढी तुमची लायकी नाही, ऐपत नाही. तुमचे खांदे मजबूत नाहीत, कणा ताठ नाही. तुम्हाला पाय नाहीत, फक्त गुडघे आहेत, म्हणून तुम्ही गुडघ्यावरच उभे असता. यातून महाराष्ट्राची विटंबना होत आहे.” ‘महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे थडगे बांधले’ दिल्लीत नेत्यांनी घेतलेल्या भेटीवर संताप व्यक्त करत राऊत म्हणाले, “काही समस्या निर्माण झाली की चर्चेसाठी अमित शहांकडे जातात. शरद पवार साहेबांनी स्थापन केलेला पक्ष आणि बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले शिवसेना हे नाव तुम्ही घेता, आणि दिल्लीतल्या व्यापाऱ्यांच्या पायाशी बसता. या लोकांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे थडगे बांधण्याचे काम केले आहे. यांना लाज वाटली पाहिजे.” ‘अजित पवारांच्या मृत्यूनंतर तो पक्ष अनाथ झालाय’ अजित पवार गटातील सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना राऊतांनी एक अत्यंत मोठे विधान केले. “अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर हा पक्ष आता अनाथ झालेला आहे. अजित पवारांच्या नावाने तो पक्ष काही काळ चालला, पण मूळ पक्ष हा शरद पवारांचाच आहे. तसेच शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आहे. हे सगळे लोक आता अनाथ आहेत. जसजसे देशातील राजकारण बदलत जाईल, तसे यांना भारतीय जनता पक्षात विलीन होण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही.” ‘भाजपकडून कोंबड्यांची झुंज’: गोकुळ दूध संघात हसन मुश्रीफ करत असलेल्या हस्तक्षेपावर बोलताना राऊत म्हणाले, “हे सगळे आमदार आता भारतीय जनता पक्षाकडूनच आदेश घेऊन काम करत आहेत. हसन मुश्रीफ हे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार काम करत आहेत. भाजप या दोन्ही पक्षांमध्ये कोंबड्यांची झुंज लावत आहे, आणि असेच झुंजवून त्यांना मारणार आहे.” —————- हेही वाचा.. सुनेत्रा-पार्थ पवारांना टाळून राष्ट्रवादीचे सहा नेते अमित शहांना भेटल्याने संशयकल्लोळ: अर्थखात्यासाठी मोर्चेबांधणी, पार्थविरोधात नाराजी असल्याची चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना टाळून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ६ ज्येष्ठ नेत्यांनी सोमवारी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीत एकच संशयकल्लोळ उडाला. अजित पवारांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वत:कडे घेतलेले अर्थखाते परत मिळवण्यासाठी तसेच पार्थ पवारांच्या कारभाराविरुद्ध नाराजी व्यक्त करण्यासाठी ही भेट होती, अशी चर्चा आहे. सविस्तर वाचा
Source link
शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये भाजप कोंबड्यांची झुंज लावत आहे:लवकरच हे दोन्ही पक्ष संपणार; संजय राऊतांचा महायुतीतील मित्रपक्षांवर हल्लाबोल