![]()
राज्यातील एमएचटी-सीईटी परीक्षेच्या निकालात पैशांच्या जोरावर फेरफार होत असल्याच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी काही ऑडिओ क्लिप, शिक्षकांचे स्टिंग ऑपरेशन आणि सादरीकरणाच्या माध्यमातून या प्रकरणातील गंभीर आरोप समोर आणले. निकालात फेरफार करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून किंवा त्यांच्या पालकांकडून मोठ्या रकमेची मागणी केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणात थेट उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही त्यांनी निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता या आरोपांशी संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये संभाषण करणारे भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी समोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार विक्रम पाचपुते आणि शिनगारे सर यांच्यातील संभाषण असल्याचं सांगितलं जात आहे. या संभाषणाच्या आधारे मुख्यमंत्र्यांनाही सीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची माहिती असून या प्रकरणात काहीतरी घडलं असल्याचं मान्य असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता. मात्र, पाचपुते यांनी हा दावा फेटाळत संभाषणातील काही भागच जाणीवपूर्वक समोर आणण्यात आल्याचा आरोप केला आहे. ऑडिओ क्लिपमधील काही भागच दाखवल्याचा विक्रम पाचपुतेंचा आरोप आमदार विक्रम पाचपुते यांनी रोहित पवार यांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिपवर आक्षेप घेतला. माझं आणि शिनगारे सरांचं जे संभाषण झालं, त्यातील सोयीचा भाग निवडून तो प्रसारित करण्यात आला आहे. त्यामुळे त्या संभाषणाचा अर्थ वेगळ्या पद्धतीने लावला जात असल्याचं पाचपुते यांनी म्हटलं आहे. पाचपुते यांच्या म्हणण्यानुसार, रोहित पवार यांनी केलेले आरोप आणि त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भूमिका यामध्ये फरक आहे. शिक्षकांकडून एमएचटी-सीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे जे दावे करण्यात येत आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचं आपण संभाषणात सांगितलं होतं. मात्र, या विधानाचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी कथित घोटाळा झाल्याचं मान्य केलं आहे, असा होत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. ‘दाव्यांमध्ये तथ्य आहे का, याचा तपास झाला पाहिजे’ या प्रकरणावर बोलताना विक्रम पाचपुते म्हणाले की, माझ्या आणि शिनगारे सरांच्या संभाषणातील संपूर्ण ऑडिओ क्लिप ऐकल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होईल. रोहित पवार यांनी संभाषणातील काही भाग प्रसारित करून त्यावरून निष्कर्ष काढला आहे. मात्र, केवळ काही सेकंदांच्या किंवा निवडक संभाषणाच्या आधारे संपूर्ण प्रकरणाचा अर्थ लावणं योग्य नाही. शिक्षकांनी एमएचटी-सीईटी परीक्षेत घोटाळे झाल्याचे जे दावे केले आहेत, त्यामध्ये कितपत तथ्य आहे, याची चौकशी झाली पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांचं मत आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तपासातून सत्य समोर येईल. मात्र, संभाषणातील थोडासा भाग घेऊन मुख्यमंत्र्यांनीच घोटाळा झाल्याचं मान्य केलं आहे, असा निष्कर्ष काढणं चुकीचं असल्याचं पाचपुते यांनी सांगितलं. रोहित पवारांचा सीईटी सेलवर गंभीर आरोप दुसरीकडे, रोहित पवार यांनी सीईटी सेलच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्याचा सीईटी सेल हा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी काम करणारा विभाग राहिला नसून भ्रष्टाचाराचं केंद्र बनल्याचा आरोप त्यांनी केला. या यंत्रणेमार्फत मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण करून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिले जात असल्याचा दावा त्यांनी केला. या आरोपांच्या समर्थनार्थ रोहित पवार यांनी काही शिक्षकांनी केलेलं स्टिंग ऑपरेशन पत्रकार परिषदेत दाखवलं. या स्टिंग ऑपरेशनमध्ये प्रवेश प्रक्रियेशी संबंधित कथित गैरव्यवहार, पैशांची मागणी आणि प्रवेश निश्चित करून देण्याच्या दाव्यांचा उल्लेख करण्यात आला. निकालात फेरफार करण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी होत असल्याचा दावा शिक्षकांनी केल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलं. टेंडरपासून प्रवेश प्रक्रियेपर्यंत गैरव्यवहार झाल्याचा दावा रोहित पवार यांनी सादर केलेल्या सादरीकरणामध्ये केवळ निकालातील फेरफाराचाच मुद्दा उपस्थित केला नाही, तर सीईटी सेलच्या कामकाजातील इतर बाबींवरही प्रश्न उपस्थित केले. टेंडर प्रक्रिया कशा पद्धतीने हाताळली जाते, परीक्षा केंद्रांचं व्यवस्थापन कसं केलं जातं आणि पैसे घेऊन प्रवेश मिळवून देण्याची हमी कशा प्रकारे दिली जाते, यासंदर्भातील कथित प्रकार त्यांनी मांडले. या संपूर्ण प्रकरणात काही शिक्षकांनी पुढाकार घेऊन स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. संबंधित पुरावे आणि संभाषणांच्या आधारे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच, या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी एमएचटी-सीईटी प्रकरणात रोहित पवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला आहे. विभागाच्या अखत्यारीतील यंत्रणेमध्ये इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप होत असताना मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, आता रोहित पवार यांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिपवर विक्रम पाचपुते यांनी स्पष्टीकरण दिल्याने या प्रकरणाला नवं राजकीय वळण मिळालं आहे. एकीकडे रोहित पवार यांनी स्टिंग ऑपरेशन आणि ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून सीईटी सेलमधील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला आहे, तर दुसरीकडे भाजप आमदाराने संभाषणाचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे एसआयटीच्या तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते आणि या कथित घोटाळ्यात कोणाची जबाबदारी निश्चित होते, याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे. हेही वाचा…. COEP प्रवेश प्रक्रियेत मोठा घोटाळा:टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी 25 लाखांचा रेट; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप महाराष्ट्रातील नामांकित ‘सीओईपी’ महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला असून, यामुळेच गेल्या काही वर्षांत महाविद्यालयाचा दर्जा आणि रँकिंग घसरल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सीईटी परीक्षेचा डेटा लीक झाल्याची तक्रार करूनही आणि सरकारने याप्रकरणी एसआयटी स्थापन करूनही पुढे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असे ते म्हणाले. या डेटा लीकमागे ‘एज्युस्पार्क’ (Eduspark) नावाच्या कंपनीचा हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, या कंपनीला तब्बल 2 हजार 300 कोटी रुपयांची कामे देण्यात आली असून, या कंपनीने बिहारमध्येही कामे घेतल्याचे रोहित पवार यांनी निदर्शनास आणून दिले. सविस्तर वाचा….
Source link
MHT-CET घोटाळ्यावरून राजकीय संघर्ष:रोहित पवारांच्या ऑडिओ क्लिपवर भाजप आमदार विक्रम पाचपुतेंचं स्पष्टीकरण