Headlines

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान स्वप्नातही करू शकत नाही:कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो – धीरेंद्र शास्त्री




नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता माफीनामा सादर केला आहे. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, त्यांचा अवमान करण्याचा विचार स्वप्नातही येऊ शकत नाही,” असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानामुळे दुखावलेल्या भावनांबद्दल माफी मागितली आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे राज्याच्या राजकारणात संतप्त पडसाद उमटले. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी या विधानाप्रकरणी बागेश्वर बाबा यांच्यावर निशाणा साधला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितली आहे. नेमके काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री? धीरेंद्र शास्त्री यांनी आज माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “काही लोकांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. आज या देशात सनातनी धर्म आणि हिंदुत्व जिवंत असेल, तर त्याचे सर्वात मोठे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जाते. ज्यांच्या स्वराज्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही ‘हिंदू राष्ट्र’ स्थापण्याचा संकल्प केला आहे, त्यांची निंदा आम्ही कधीच सहन करणार नाही. महाराजांप्रती आणि संतांप्रती असलेला त्यांचा भाव मी माझ्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला होता.” आपसांतील वादाचा इशारा धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, ते सर्व आमचेच लोक आहेत. अशा मुद्द्यांवरून आपण आपापसात वाद घातला, तर त्याचा फायदा केवळ दुसऱ्यांनाच होईल. माझ्या मनात कुणाबद्दलही चुकीचा हेतू नव्हता, तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी क्षमा मागतो.” चार मुले आणि संघाबद्दलच्या विधानावरही खुलासा नागपूर येथील याच कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी ‘प्रत्येकाने चार मुलांना जन्म देऊन त्यातील एक मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) द्यावा’ असे विधान केले होते. यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “संघाला मुलगा देण्याचा अर्थ असा की, त्याला कट्टर राष्ट्रवादी बनवा. तो कलेक्टर असो, शिक्षक असो वा इतर काही, पण त्याचे विचार कट्टर सनातनी असायला हवेत, असा माझा उद्देश होता,” असे त्यांनी नमूद केले. वादाची पार्श्वभूमी काय? नागपूरमधील एका प्रवचनात बोलताना शास्त्री यांनी ‘शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यांनी आपला मुकूट रामदास स्वामींच्या चरणी अर्पण केला होता’ असा दावा केला होता. या विधानामुळे इतिहासाची मोडतोड झाल्याचा आरोप करत संभाजी छत्रपती यांच्यासह अनेक संघटनांनी शास्त्री यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. अखेर वाढता विरोध पाहून शास्त्री यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *