![]()
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई व आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी जन सत्याग्रह संघटनेतर्फे केली. संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले. शासनाने दुष्काळ जाहीर केला. मात्र नुकसानभरपाई वितरणाबाबत शासन निर्णय जारी न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाअभावी व नैसर्गिक परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतीचा खर्च, कर्जाचा वाढता बोजा, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणेही कठीण झाले. दिवाळी सण जवळ आला असताना शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने कुटुंबासोबत सण कसा साजरा करावा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष आर्थिक मदत देण्याची गरज असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे. जन सत्याग्रह संघटनेने अकोला जिल्ह्यातील सर्व पात्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन नियमानुसार तातडीने नुकसानभरपाई द्यावी. पाठपुरावा करावा. कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच नुकसानभरपाई मिळण्याची निश्चित कालमर्यादा जाहीर करावी, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. संकटाच्या काळात शासन व प्रशासनाने संवेदनशीलतेने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. संबंधित कृषी व महसूल विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही जन सत्याग्रह संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी आसिफ अहमद खान, शकूर खान लोधी, फिरोज खान, मोहम्मद उमर फारुख, शेख ज़हीर कुरैशी आदी होते. खात्यात रक्कम जमा व्हावी “शेतकऱ्यांच्या घरातही दसरा-दिवाळी आनंदाने साजरी व्हावी. त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा. आर्थिक विवंचनेमुळे शेतकरी कुटुंबाला सणापासून वंचित राहावे लागू नये. त्यामुळे सणांपूर्वीच नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी,’ अशी मागणी जन सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आसिफ अहमद खान यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
Source link
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भरपाई द्या:जन सत्याग्रह संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी