![]()
कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून राजकीय वातावरण तापले असतानाच, भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, गोकुळचा निर्णय हा तिथल्या काही स्थानिकांच्या मागण्यांवर आधारित आहे. यावर सहकारमंत्री, पालकमंत्री आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र बसून राज्य सरकारचे पूरक कार्य, गोकुळला केलेली मदत आणि सहकार्य याकरिता सरकार व निवडून आलेली समिती यांच्यात समन्वय साधण्यासाठीच हा निर्णय घेतला असावा. दरम्यान, नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या लोकशाही बचाव यात्रेबाबत बोलताना बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी आम्ही नागपुरात रॅली आयोजित केली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह 30 ते 35 हजार नागरिक एकत्र येणार असून, याद्वारे राहुल गांधी यांना एक ठोस उत्तर दिले जाईल, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राहुल गांधी नेमके काय म्हणाले? राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट करत भाजपच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले: मतांची चोरी: गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपला हरवले. त्यामुळे भाजपने निवडणुकीनंतर नियम बदलले. 4 संचालक नव्याने घुसवले, 12 चे 16 केले आणि बहुमत चोरले. ही दूध उत्पादकांच्या मतांची चोरी आहे, हा जनादेशातील भेसळ करण्याचा प्रकार आहे. भाजपची हताशा: भाजप आता इतकी हताश झाली आहे की, प्रत्येक ठिकाणी आपली सत्ता वाचवण्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार आहेत. शेतकरी विसरणार नाही: भाजपला थेट इशारा देताना ते म्हणाले, दूध उत्पादकांच्या मतांची चोरी करणाऱ्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी – शेतकरी हे कधीच विसरत नसतो.
धन्यवाद राहुल जी, साडेपाच लाख दूध उत्पादकांचा आवाज बनल्याबद्दल- सतेज पाटील गोकुळ दूध संघाच्या साडेपाच लाख दूध उत्पादकांची बाजू मांडण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल राहुल गांधी यांचे सतेज पाटील यांनी आभार मानले आहेत. गोकुळचा जनादेश हा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा असून, त्यांच्या हक्काचा आणि निर्णयाचा आदर झाला पाहिजे, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. गोकुळच्या प्रश्नावर आता केवळ राजकीय पातळीवरच नव्हे, तर कायदेशीर मार्गानेही लढा दिला जाईल. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी न्यायालयातही लढू आणि गरज पडल्यास रस्त्यावर उतरूनही संघर्ष करू, असा इशारा सतेज पाटील यांनी दिला.
Source link