Headlines

गोकुळच्या मैदानात रोहित पवारांची एन्ट्री:गोकुळ ताब्यात घेण्याचा सरकारचा 'रडीचा डाव' उधळण्यासाठी कोल्हापुरात येणार




गोकुळ दूध संघातील शासननियुक्त 5 स्वीकृत संचालकांच्या नियुक्तीवरून कोल्हापूरच्या राजकारणात संघर्ष तीव्र झाला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी आंदोलनाची भूमिका घेतली असून, 9 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. आता या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही पाठिंबा दिला आहे. सरकारचा निर्णय लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप करत आपण स्वतः या मोर्चात सहभागी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे गोकुळच्या सत्तासंघर्षाला आता राजकीय रंग चढला आहे. गोकुळमधील 5 स्वीकृत संचालकांच्या नियुक्तीवरून वाद कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये सध्या सतेज पाटील यांच्या गटाचे वर्चस्व आहे. संघाच्या संचालक मंडळात सतेज पाटील यांच्या गटाचे 13 संचालक असून, महायुती समर्थित गटाचे 12 संचालक आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सतेज पाटील यांच्या गटाकडे बहुमत असल्याचे चित्र आहे. मात्र, राज्य सरकारने गोकुळमध्ये 5 शासननियुक्त स्वीकृत तज्ज्ञ संचालक नेमण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे या नियुक्त करण्यात येणाऱ्या संचालकांना मतदानाचा अधिकारही देण्यात आला आहे. त्यामुळे गोकुळच्या सध्याच्या सत्तासमीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पाच संचालकांना मतदानाचा अधिकार मिळाल्यास अध्यक्ष निवडीच्या वेळी महायुती समर्थित गटाचे पारडे जड होऊ शकते. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला सतेज पाटील यांच्या गटाकडून तीव्र विरोध केला जात आहे. सहकारी संस्थेच्या निवडणुकीतून निवडून आलेल्या संचालक मंडळाच्या अधिकारांवर गदा आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा आक्षेप विरोधकांकडून घेतला जात आहे. 9 नोव्हेंबरला दसरा चौकातून मोर्चा सरकारच्या निर्णयाविरोधात सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या निर्णयाविरोधात जनतेची ताकद दाखवण्यासाठी 9 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली आहे. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार असून, सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या मोर्चात गोकुळशी संबंधित दूध उत्पादक, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सहकार क्षेत्राच्या स्वायत्ततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी या मुद्द्यावर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. रोहित पवारांचीही आंदोलनात एन्ट्री गोकुळच्या या संघर्षात आता आमदार रोहित पवार यांचीही एन्ट्री झाली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या निर्णयावर टीका करत 9 नोव्हेंबरच्या मोर्चात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘सरकारचा रडीचा डाव उधळून लावण्यासाठी मीही कोल्हापूरला येतोय,’ अशा शब्दांत रोहित पवार यांनी आपली भूमिका मांडली. तसेच कोल्हापूरकरांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ‘जनतेची ताकद दाखवू आणि लोकशाहीसह गोकुळही वाचवू,’ असे म्हणत त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्चाला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचाही राजकीय पाठिंबा मिळाला आहे. गोकुळच्या प्रश्नावरून विरोधक एकत्र येत असल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. सतेज पाटलांचा मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांवर आरोप दरम्यान, गोकुळच्या मुद्द्यावरून सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली. या संपूर्ण घडामोडींमागे मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. गोकुळमध्ये सत्तांतर घडवून आणण्यासाठीच पाच स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. हसन मुश्रीफ यांनी केलेल्या आरोपांनाही सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. राजकीय संबंध आणि मैत्रीच्या मुद्द्यावरून त्यांनी मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. ‘दोस्ती कुठली? त्यांनी गद्दारी केली,’ अशा शब्दांत सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. एकीकडे सरकारचा निर्णय, दुसरीकडे सतेज पाटील यांचा विरोध आणि आता रोहित पवार यांचा आंदोलनातील सहभाग यामुळे गोकुळचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. 9 नोव्हेंबरच्या मोर्चातून विरोधक सरकारला किती मोठे आव्हान देतात आणि या आंदोलनाचा गोकुळच्या सत्तासमीकरणावर काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचा सोर्स गरीब माणूस:त्याच्या जिवाला धोका होऊ नये; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी मीडियासमोर जबाबदारी घ्यावी -मनोज जरांगे मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या कथित 500 कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला थेट आव्हान दिले आहे. विशेष तपास पथकाने (SIT) ऑडिओ क्लिपची मागणी केल्यानंतर जरांगे यांनी स्पष्ट केले की, “तपास यंत्रणेला क्लिप द्यायला आम्ही कधीही तयार आहोत; आमच्या वकिलांनी ती दिलीही असेल. पण सरकारला जर या क्लिपचा मूळ सोर्स (स्रोत) हवा असेल, तर आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या व्यक्तीच्या सुरक्षेची जाहीर जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तो सोर्स एखादा सामान्य आणि गरीब माणूस असू शकतो, त्याच्या जिवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही,” अशी आक्रमक भूमिका जरांगे यांनी जालना येथे पत्रकारांशी बोलताना मांडली. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *