Headlines

एमएमसी निवडणुकीत अमरावतीत कमी प्रतिसाद:केवळ 18.9 टक्के मतदान, 2 हजार 565 पैकी 464 डॉक्टरांनी बजावला मतदानाचा हक्क




महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील डॉक्टरांनी अत्यंत कमी प्रतिसाद दिला. एकूण २,५६५ मतदारांपैकी केवळ ४६४ डॉक्टरांनीच मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३२२ पुरुष आणि १४२ महिला डॉक्टरांचा समावेश आहे, ज्यामुळे मतदानाची टक्केवारी केवळ १८.९ टक्के राहिली. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, अमरावतीतील वाढलेले तापमान (४६.८ अंश सेल्सिअस) आणि एमएमसीबद्दलची अनास्था यामुळे मतदानाचा टक्का घसरल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले आहे. या निवडणुकीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) परिसरात चार मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. शहरी भागातील डॉक्टरांनी काही प्रमाणात सहभाग घेतला असला तरी, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील डॉक्टरांनी मतदानासाठी येणे टाळले. रविवार हा वैद्यकीय व्यावसायिकांसाठी सुट्टीचा दिवस असूनही, अनेक डॉक्टरांनी उन्हामुळे घराबाहेर न पडण्याला प्राधान्य दिले. एमएमसी ही राज्यभरातील दवाखाने आणि डॉक्टरांच्या सेवा नियंत्रित करणारी १८ सदस्यीय प्राधिकारिणी आहे. यापैकी नऊ सदस्यांची निवड थेट मतदानाद्वारे केली जाते, तर उर्वरित नऊ सदस्य नामांकन पद्धतीने नियुक्त केले जातात. मतदानाने निवडल्या जाणाऱ्या नऊ जागांसाठी तब्बल ६० उमेदवार रिंगणात होते. प्रत्येक मतदाराला नऊ मते देण्याचा अधिकार होता. निवडणूक उपजिल्हाधिकारी शिवाजीराव शिंदे यांनी मतदानासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली होती. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ५ मतदान पथके नियुक्त करण्यात आली होती, ज्यात एकूण २५ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, चारही केंद्रांवरील मतपेट्या कडेकोट बंदोबस्तात मुंबईला रवाना करण्यात आल्या. या मतपेट्या मुंबई येथील हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून मतपेट्या मुंबईत पोहोचल्यानंतर मतमोजणी सुरू केली जाईल. मतपेट्या सुरक्षित पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, महसूल आणि पोलिस यंत्रणेतील अधिकारीही वाहनांसोबत मुंबईकडे रवाना झाले आहेत. या निवडणुकीत अमरावतीतून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) केंद्रीय समितीचे पदाधिकारी डॉ. वसंत लुंगे हे उमेदवार आहेत. यापूर्वी २००९ साली आयएमएच्या अमरावती शाखेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. उद्धव देशमुख यांनी ही निवडणूक लढवून जिंकली होती. ही निवडणूक स्थानिक डॉक्टरांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *