![]()
अमरावतीत राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेच्या निवड समितीत राजकीय कार्यकर्त्यांचा भरणा असल्याचा आरोप कलावंतांनी केला आहे. समिती न बदलल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या समितीतील सदस्यांना कला क्षेत्राचा अनुभव नसल्याने त्यांची नियुक्ती अयोग्य असल्याचे कलावंतांचे म्हणणे आहे. याबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार देण्यात आली; मात्र अद्याप त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या या योजनेतील लाभार्थी निवडण्यासाठी जिल्हा समितीत ९ ज्येष्ठ मान्यवर कलाकार आणि १ मान्यवर साहित्यिक असे १० सदस्य असणे आवश्यक आहे. शासन निर्णयात हा निकष नमूद आहे. दोन महिन्यांपूर्वी जाहीर झालेल्या यादीत १ ज्येष्ठ मान्यवर साहित्यिक आणि २-३ मान्यवर कलाकार वगळता, अर्ध्यापेक्षा जास्त अशासकीय सदस्य राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याचा तक्रारकर्त्यांचा दावा आहे. त्यांना कला क्षेत्राचा अनुभव नसल्याने ते योग्य कलाकारांची निवड कशी करतील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. समितीत कला क्षेत्राचा अनुभव असलेल्या ज्येष्ठ कलाकारांची नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्ह्यातील कलावंत आणि स्थानिक कलावंत संघटनांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. निवेदन देताना कलारसिक संस्थेचे अध्यक्ष भोलेश्वर मुदगल, संजय अग्रवाल, अजय शिंपी, लक्ष्मण आमले, नंदकिशोर पाटील, रवींद्र बन, प्रकाश वानखडे आणि राजेंद्र इंगोले यांच्यासह शहरातील अन्य कलावंत उपस्थित होते. **शासन निर्णयाच्या निकषांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप** निवड समितीत ज्येष्ठ मान्यवर कलाकार नसल्याने अपात्र सदस्य कलाकारांना पात्र कसे ठरवतील, याबाबत जिल्ह्यातील कलावंतांनी शंका व्यक्त केली. त्यामुळे भविष्यात पात्र कलाकारांच्या निवडीवर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. शासन निर्णयातील निकषांकडे दुर्लक्ष करून १० सदस्यीय समितीत अपात्र व्यक्तींना स्थान दिल्याचा आरोपही त्यांनी केला. पालकमंत्र्यांनी फेरविचार करावा: प्रमोद पोकळे कलाकार निवड समितीत शासन निर्णयातील निकषांनुसार मान्यवर कलाकार सदस्य असणे अपेक्षित आहे. त्यामुळे योग्य लाभार्थी निवडता येईल, असे कलावंत आधार संघाचे समन्वयक प्रमोद पोकळे यांनी म्हटले. पालकमंत्र्यांनी या समितीवर मान्यवर कलाकारांची नियुक्ती करावी, अशी मागणीही पोकळे यांनी केली.
Source link
निवड समितीत राजकीय कार्यकर्त्यांचा भरणा:अमरावतीतील कलावंतांचा आरोप; समिती न बदलल्यास आंदोलनाचा इशारा