Headlines

एसआरए प्रक्रियेवरून विरोधक सरकारला बदनाम करत असल्याचा आरोप:बैजयंत जय पंडा म्हणाले, काँग्रेस जनतेची दिशाभूल करत आहे




एसआरए प्रक्रियेबाबत विरोधक जाणीवपूर्वक संभ्रम आणि अफवा पसरवून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप महाराष्ट्र भाजपचे प्रभारी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार बैजयंत जय पंडा यांनी केला. निवडणुकीत वारंवार पराभव होत असल्याने विरोधक ‘गोरिला तंत्रा’चा वापर करून सरकारी यंत्रणांवर अविश्वास निर्माण करत असल्याचे ते म्हणाले. एसआरए प्रक्रियेच्या समर्थनार्थ आयोजित पत्रकार परिषदेत पंडा बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार कौस्तुभ गावडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, सुशील मेंगडे आणि पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. पंडा म्हणाले, स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत १२ वेळा एसआरए प्रक्रिया राबवण्यात आली आहे. सुमारे २० वर्षांपूर्वीही अशीच प्रक्रिया राबवण्यात आली होती. देशाची लोकसंख्या १४० कोटींहून अधिक आहे. या प्रक्रियेत सहा कोटी तीन लाख लोक स्थलांतरित झाल्याची, दोन कोटी १८ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची आणि एक कोटी बनावट नावे असल्याची माहिती समोर आली आहे, असा दावा त्यांनी केला. तीन कोटी लोकांची वारंवार तपासणी करूनही त्यांची पडताळणी पूर्ण होऊ शकलेली नाही, असेही पंडा म्हणाले. नागरिक पडताळणीसाठी स्वतःहून पुढे येऊ शकतात. मात्र, देशात घुसखोरी करून आलेल्या लोकांना आपले अस्तित्व उघड होण्याची आणि पकडले गेल्यास मायदेशी परत पाठवले जाण्याची भीती असते. त्यामुळे ते पडताळणीसाठी पुढे येत नाहीत, असा दावा त्यांनी केला. अनेक वर्षे देशात राहूनही अशा लोकांना आपली ओळख सिद्ध करता येत नाही, असे पंडा म्हणाले. काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असून, भाजप तथ्यांच्या आधारे जनजागृती करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. २०१४ ते २०२५ या काळात काँग्रेसने विधानसभा निवडणुकांमध्ये ५२ वेळा पराभव स्वीकारला. सत्तेत परतण्यात अपयश आल्याने विरोधक खोटे दावे करत असल्याचे पंडा म्हणाले. बीएलओंना भेटणे टाळणे, ऑनलाइन नोंदणी न करणे आणि निवडणूक व्यवस्थेबाबत अविश्वास निर्माण करणे असे प्रकार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राजकीय अपयश झाकण्यासाठी सरकारी यंत्रणांना दोष देणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. विरोधक संसदेत कामकाज होऊ देत नाहीत आणि महत्त्वाचे प्रश्न मांडत नाहीत; मात्र अफवा पसरवतात. त्यानंतर त्यांच्यावर न्यायालयात माफी मागण्याची वेळ येते, अशी टीका पंडा यांनी केली. भारताची निवडणूक व्यवस्था सक्षम आहे. जगातील अनेक देश भारतीय निवडणूक व्यवस्थेचा अभ्यास करून आपली यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करतात, असे पंडा म्हणाले. सरकारी यंत्रणांविरोधात चुकीचे आरोप करून देशाच्या व्यवस्थेबाबत संभ्रम निर्माण केला, तर भाजप राष्ट्रहितासाठी सत्य जनतेसमोर आणेल, असेही त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *