![]()
मंत्रालयातील विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अनेक साहित्यप्रेमी, कवी आणि कलावंत आहेत. त्यांच्या अंगभूत साहित्यिक, सांस्कृतिक आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आपलं मंत्रालय’ हे सशक्त व्यासपीठ ठरत आहे. या गृहपत्रिकेच्या माध्यमातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या साहित्यिक अभिव्यक्तीला वाव देण्याची संधी मिळत असून, त्यांनी या व्यासपीठाशी सक्रियपणे जोडले जावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. दीपावलीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेअंतर्गत मंत्रालयातील परिषद सभागृहात विशेष काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, साहित्यप्रेमी आणि कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्रिजेश सिंह म्हणाले की, मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अनेक जण कविता, साहित्य आणि लेखनाची आवड जोपासत आहेत. मात्र, त्यांच्या या कलागुणांना सादरीकरणासाठी योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेचे प्रकाशन करण्यात येते. या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपले विचार, भावना, अनुभव आणि साहित्यिक अभिव्यक्ती मांडण्याची संधी मिळते. अशा उपक्रमांमुळे शासकीय कामकाजाच्या व्यस्त दिनक्रमातून बाहेर पडून व्यक्तिमत्त्वातील सर्जनशील पैलू समोर येण्यास मदत होते. ‘आपलं मंत्रालय’ हे केवळ एक गृहपत्रिका किंवा मासिक नसून मंत्रालयातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे स्वतःचे व्यासपीठ आहे. त्यामुळे सर्वांनी या मासिकाशी आपलेपणाने जोडले जावे. आपल्या कविता, लेख, अनुभव आणि साहित्यिक योगदानातून या मासिकाला अधिक समृद्ध करावे. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या लेखनाचे आणि साहित्याचे मनापासून स्वागत आहे, असेही सिंह यांनी स्पष्ट केले. वाचनामुळे व्यक्तीला विचारांची नवी दृष्टी मिळते : विकास खारगे यावेळी अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, वाचनामुळे व्यक्ती प्रगल्भ होते आणि तिला विचार करण्याची नवी दृष्टी मिळते. सामान्य व्यक्तीला असामान्य बनविण्याची ताकद वाचनामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात वाचनाची आवड जोपासली पाहिजे. वाचनामुळे केवळ ज्ञानात भर पडत नाही, तर व्यक्तीच्या विचारप्रक्रियेतही सकारात्मक बदल घडतो. शासनाच्या वतीने साहित्य, कला आणि संगीत क्षेत्राच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या उपक्रमांचा लाभ घेऊन आपल्या अंगभूत कलागुणांना अधिक विकसित करावे. संबंधित विभागांच्या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन घ्यावे आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही खारगे यांनी केले. दहा कवींनी सादर केल्या विविध विषयांवरील कविता दीपावलीनिमित्त आयोजित या काव्यसंध्येत मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कविता सादर केल्या. सतीश मोघे, डॉ. नामदेव भोसले, मीनाक्षी पाटील, लीना संखे, अंजली ढमाळ, अजय भोसले, नामदेव कोळी, डॉ. जगदीश मोरे, शशी डंभारे आणि प्रवीण कुलकर्णी यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून विविध विषयांना स्पर्श केला. या कवितांमधून सामाजिक प्रश्न, सांस्कृतिक मूल्ये, मानवी नातेसंबंध, जीवनातील अनुभव आणि विविध भावभावनांचे दर्शन घडले. प्रत्येक कवीने आपल्या शब्दांतून मांडलेल्या भावना आणि विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कविता, शब्द आणि भावनांच्या या मैफलीमुळे मंत्रालयातील वातावरण साहित्यिक रंगांनी भारावून गेले. ‘वाघूर’ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन या कार्यक्रमात कवी नामदेव कोळी यांच्या ‘वाघूर’ या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. साहित्यिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. दीपावलीच्या आनंदोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या या काव्यसंध्येमुळे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपली साहित्यिक प्रतिभा सादर करण्याची संधी मिळाली. अशा उपक्रमांमुळे शासकीय कामकाजाबरोबरच साहित्य, कला आणि संस्कृतीची आवड जोपासणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळत असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले. या कार्यक्रमाला अपर मुख्य सचिव विकास खारगे, माहिती संचालक (प्रशासन) डॉ. किशोर गांगुर्डे, माहिती संचालक (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी, उपसंचालक (वृत्त) वर्षा आंधळे आणि मुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी कीर्ती पांडे उपस्थित होते. हेही वाचा… शंभूराज देसाईंचे केंद्राकडे बोट, शिवेंद्रसिंहराजेंनी मांडले कारखान्यांचे आर्थिक गणित:मात्र साडेचार हजारांच्या ऊसदराच्या मागणीवर शेतकरी ठाम, महामार्गावरील आंदोलन थांबेना! ऊसदराच्या प्रश्नावरून सातारा जिल्ह्यात शेतकरी आंदोलन चांगलेच पेटले असून, पुणे-बंगळूर महामार्गावरील रास्ता रोको आंदोलन अद्याप सुरूच आहे. प्रतिटन 4,500 रुपये ऊसदर आणि इथेनॉलला प्रतिलिटर 70 रुपये दर मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असले, तरी शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि कारखानदारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. मात्र, शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला दराचा ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आश्वासनांवर आंदोलन मागे घेणार नसल्याचे स्पष्ट करत संघटनेने महामार्गावरील लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सविस्तर वाचा….
Source link
मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक कलागुणांना ‘आपलं मंत्रालय’चे व्यासपीठ:दीपावलीनिमित्त काव्यसंध्येचे आयोजन