Headlines

मुश्रीफांचा नवा फॉर्म्युला शेतकऱ्यांना अमान्य:ऊसदराची बैठक फिस्कटली, राजू शेट्टी 4,200 रुपयांवर तोडग्यास तयार




ऊसदराच्या प्रश्नावरून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. उसाला प्रतिटन 4,500 रुपये दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन तिसऱ्या दिवशीही कायम आहे. आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाच ऊसदरावर तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीत कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. कारखानदारांनी दिलेला प्रस्ताव आणि शेतकरी संघटनेची भूमिका यामध्ये एकमत न झाल्याने चर्चा निष्फळ ठरली. या बैठकीत कारखानदारांच्या वतीने प्रतिटन 3,900 रुपये पहिली उचल आणि कारखाने सुरू झाल्यानंतर आणखी 100 रुपये देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव शेतकरी संघटनेला मान्य झाला नाही. विशेष म्हणजे, यापूर्वी प्रतिटन 4,500 रुपयांच्या मागणीवर ठाम असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चर्चेतून मार्ग काढण्यासाठी आपली भूमिका काहीशी मवाळ केली होती. प्रतिटन 4,200 रुपये मिळाल्यास तोडग्याचा विचार करता येईल, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले होते. असे असतानाही कारखानदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बैठक फिस्कटली आणि आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला. मुश्रीफांच्या फॉर्म्युल्यामुळे चर्चेचे गणित बिघडले? बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. काही कारखानदार प्रतिटन 4,200 रुपये देण्यास तयार असल्याचे चित्र असताना मुंबईहून बैठकीला आलेल्या मुश्रीफ यांनी नवीन फॉर्म्युला मांडला. त्यामुळे आधी सकारात्मक भूमिका घेणारे कारखानदारही मागे हटले, असा आरोप शेट्टी यांनी केला. कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याऐवजी एकत्रितपणे कमी दर देण्याची भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती आणि एफआरपी एकसारखी नाही. काही कारखान्यांची एफआरपी 3,800 ते 3,900 रुपयांच्या दरम्यान आहे, तर काही कारखान्यांची एफआरपी 4,100 ते 4,300 रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे सर्व कारखान्यांनी एकच भूमिका घेणे योग्य नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले. कारखानदारांनी एकत्र येऊन सिंडिकेट तयार केल्याचा आरोप करत त्यांनी या भूमिकेला विरोध दर्शविला. ‘कारखानदार आडमुठे असतील तर आम्ही सांगतो तेच ऐकावे’ बैठकीनंतर बोलताना राजू शेट्टी यांनी कारखानदारांना स्पष्ट इशारा दिला. कारखानदार आडमुठेपणाची भूमिका घेत असतील, तर शेतकरी संघटना सांगत असलेला दर त्यांनी मान्य करावा, अशी आमची ठाम भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. साखरेच्या बाजारभावाचा विचार करून कारखानदारांनी दर निश्चित करावा. केवळ सर्व कारखानदारांनी एकत्र येऊन कमी दर देण्याचा प्रयत्न केल्यास तो सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. संघटनेने 4,500 रुपयांच्या मागणीवरून 4,200 रुपयांपर्यंत येण्याची तयारी दाखवली असतानाही कारखानदारांकडून तोडगा काढण्याची तयारी दिसत नसल्याने शेट्टी यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे आता पुढील चर्चेत कारखानदार काय भूमिका घेतात आणि प्रशासन मध्यस्थी करून तोडगा काढण्यात यशस्वी होते का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 55 तासांहून अधिक काळ महामार्ग रोखला; वाहतुकीवर मोठा परिणाम दरम्यान, ऊसदराच्या मागणीसाठी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली नाका येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. सलग 55 तासांहून अधिक काळ शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या दिल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. हजारो मालवाहू ट्रक, टँकर तसेच प्रवासी वाहने अडकून पडली आहेत. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोल्हापूर आणि सांगली परिसरातून मुंबई, पुणे तसेच नाशिककडे होणारी दूध आणि भाजीपाल्याची वाहतूकही प्रभावित झाली आहे. मालवाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने काही भागांत दूधपुरवठ्यावर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. भाजीपाल्याच्या वाहतुकीलाही विलंब होत असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी आंदोलनस्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. लहान वाहनांची वाहतूक पर्यायी अंतर्गत मार्गांवरून वळविण्यात येत आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा बंद करण्याचा शेट्टींचा इशारा ऊसदराच्या प्रश्नावर लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा योग्य दर मिळालाच पाहिजे. कारखानदारांनी चर्चेतून मार्ग काढला नाही आणि साखरेच्या दराच्या तुलनेत योग्य मोबदला दिला नाही, तर सांगली, कोल्हापूर आणि सातारा हे तीनही जिल्हे पूर्णपणे बंद पाडले जातील, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे ऊसदराच्या आंदोलनाचा प्रश्न आता केवळ कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यातील चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचा परिणाम महामार्गावरील वाहतूक आणि दैनंदिन जीवनावरही होत आहे. एका बाजूला शेतकरी 4,200 रुपये प्रतिटन दरावर तोडग्यासाठी तयार असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे कारखानदारांचा 3,900 रुपये पहिली उचल आणि नंतर 100 रुपये देण्याचा प्रस्ताव आहे. या दोन्ही भूमिकांमध्ये समन्वय न झाल्यास आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आता प्रशासन आणि सरकार या पेचावर काय तोडगा काढणार, याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… शंभूराज देसाईंचे केंद्राकडे बोट, शिवेंद्रसिंहराजेंनी मांडले कारखान्यांचे आर्थिक गणित:मात्र साडेचार हजारांच्या ऊसदराच्या मागणीवर शेतकरी ठाम, महामार्गावरील आंदोलन थांबेना! ऊसदराच्या प्रश्नावरून सातारा जिल्ह्यात शेतकरी आंदोलन चांगलेच पेटले असून, पुणे-बंगळूर महामार्गावरील रास्ता रोको आंदोलन अद्याप सुरूच आहे. प्रतिटन 4,500 रुपये ऊसदर आणि इथेनॉलला प्रतिलिटर 70 रुपये दर मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असले, तरी शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि कारखानदारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. मात्र, शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला दराचा ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आश्वासनांवर आंदोलन मागे घेणार नसल्याचे स्पष्ट करत संघटनेने महामार्गावरील लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *