![]()
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने क्यूएस दक्षिण आशिया विद्यापीठ क्रमवारी २०२७ मध्ये ३२४ वे स्थान मिळवले आहे. मागील वर्षी विद्यापीठ ३३० व्या स्थानी होते. यंदा सहा स्थानांची सुधारणा झाली आहे. क्यूएस ही उच्च शिक्षण संस्थांची जागतिक क्रमवारी ठरवणारी संस्था आहे. ती शैक्षणिक प्रतिष्ठा, रोजगारदात्यांमधील प्रतिष्ठा, संशोधनाचा प्रभाव, आंतरराष्ट्रीय संशोधन सहकार्य, प्राध्यापक-विद्यार्थी गुणोत्तर आणि प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता अशा निकषांवर विद्यापीठांचे मूल्यमापन करते. प्राध्यापकांच्या पीएच.डी. पात्रतेच्या निकषात विद्यापीठाला ९२.२ गुण मिळाले. प्रति प्राध्यापक संशोधन प्रकाशनांसाठी ७३.२, आंतरराष्ट्रीय संशोधन नेटवर्कसाठी २६.१ आणि प्रति संशोधन लेख उद्धरणांसाठी २५.९ गुण मिळाले. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, संस्थात्मक विकास आणि आंतरराष्ट्रीय मानांकनासाठी उपक्रम राबवले. कक्षाचे संचालक डॉ. संदीप वाघुळे यांनी नियोजन, समन्वय, गुणवत्ता वाढीच्या उपक्रमांची अंमलबजावणी आणि कामगिरीचे नियमित मूल्यमापन केले. या कामगिरीत प्राध्यापक आणि संशोधकांचे संशोधन, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांचे योगदान असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. यापूर्वी क्यूएस आशिया विद्यापीठ क्रमवारी २०२६ मध्ये विद्यापीठाला आशियातील १००१ ते ११०० या गटात स्थान मिळाले होते. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी प्राध्यापक, संशोधक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि संलग्न महाविद्यालयांचे अभिनंदन केले. भविष्यात संशोधनाची गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय सहकार्य, उद्योगांशी समन्वय आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी अधिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Source link
अमरावती विद्यापीठ क्यूएस दक्षिण आशिया क्रमवारीत 324 व्या स्थानी:गतवर्षीच्या तुलनेत सहा स्थानांची सुधारणा; 2027 च्या क्रमवारीत संशोधन आणि प्राध्यापकांच्या पात्रतेत गुण