Headlines

लक्ष्मीपूजनासाठी अमरावतीच्या बाजारात खरेदीची गर्दी:फुले, फळे, केरसुणी, ऊस आणि पूजेच्या साहित्याला मागणी; व्यापारी वहीखात्यांची पूजा करणार




अमरावतीत लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठेत गर्दी करत आहेत. फुले, फळे, नवीन केरसुणी, ऊस, नारळ आणि पूजेच्या इतर वस्तूंना मागणी आहे. रस्त्याच्या कडेला फुले आणि पूजासाहित्याचे स्टॉल लागले आहेत. पणत्यांची दुकाने आणि रांगोळीचे रंग यामुळे बाजारपेठेत दिवाळीची तयारी दिसत आहे. लक्ष्मीपूजनात नवीन केरसुणीला विशेष महत्त्व असल्याने तिची स्वतंत्र दुकाने सजली आहेत. घराची स्वच्छता आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून नागरिक केरसुणी खरेदी करतात. पूजेसाठी ऊस, नारळ, झेंडूच्या माळा, कमळाची फुले, बताशे, लाह्या, खारीक-बदाम यांनाही मागणी आहे. सफरचंद, पेरू, डाळिंब आणि सीताफळ ही फळेही पूजेसाठी घेतली जात आहेत. यंदा झेंडूच्या फुलांचे दर वाढले आहेत. तरीही ग्राहक फुले खरेदी करत आहेत. पिवळ्या आणि नारंगी झेंडूच्या माळांना अधिक पसंती मिळत आहे. व्यापारीही लक्ष्मीपूजनाची तयारी करत आहेत. नवीन वर्षाच्या व्यवहारासाठी ते नवीन वह्या, खाती आणि हिशोबाच्या डायऱ्या घेत आहेत. त्यांवर कुंकवाने शुभ-लाभ आणि स्वस्तिक काढून पूजा केली जाते. जुने हिशोब पूर्ण करून नवीन आर्थिक व्यवहारांची नोंद सुरू करण्याची परंपरा व्यापारी आजही पाळतात. लक्ष्मीपूजनानंतर मंगळवारी दीपावली पाडवा साजरा होणार आहे. नवीन व्यवसाय, वाहन खरेदी आणि शुभकार्य सुरू करण्यासाठी पाडव्याचा मुहूर्त महत्त्वाचा मानला जातो. लक्ष्मीपूजनानंतरही बाजारातील खरेदी सुरू राहील, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवाळीच्या खरेदीमुळे बाजारात चैतन्य आहे. आगामी दिवसांत विक्री आणखी वाढेल, अशी आशा व्यापारी व्यक्त करत आहेत. यंदा बाजारात मातीच्या पारंपरिक पणत्यांसह विविध आकारांच्या आणि डिझाइनच्या पणत्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घरासमोर आरास करण्यासाठी आणि लक्ष्मीपूजनासाठी ग्राहक मातीचे दिवे खरेदी करत आहेत. आकाशकंदील, रांगोळीचे रंग, धूप, अगरबत्ती, सुगंधित तेल आणि लक्ष्मीच्या मूर्तींनाही मागणी आहे, असे विक्रेत्या क्रांती ढवळे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *