Headlines

शेत जमिनीचे आरोग्य अन् दर्जेदार पिकांसाठी सेंद्रिय शेती आवश्यक:डॉ. सुरेश दोडके यांचे प्रतिपादन, प्रशिक्षण कार्यशाळेला प्रतिसाद




जमिनीचे आरोग्य, जैवविविधता आणि सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक व सेंद्रिय निविष्ठांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या व्यवस्थापनासाठी पाणी व खतांचे काटेकोर नियोजन करून उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करावा. जैविक व सेंद्रिय निविष्ठांच्या वापरामुळे उत्पादन खर्च कमी होण्यासोबतच जमिनीची सुपीकता आणि दीर्घकालीन उत्पादकता टिकवून ठेवण्यास मदत होते, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश दोडके यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली व विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या नेतृत्वात विद्यापीठाचा भाकृअप-शेतकरी प्रथम प्रकल्प, कडधान्य सुधार प्रकल्प आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फुले समृद्ध गाव तांभेरे येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘खेत बचाव’ अभियानांतर्गत तांभेरे व कानडगाव येथील शेतकऱ्यांसाठी ‘हरभरा व रब्बी ज्वारीचे सुधारित उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर प्रशिक्षण घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. दोडके बोलत होते. यावेळी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, डॉ. सचिन सदाफळ, डॉ. दत्तात्रय पाचारणे, डॉ. महेश भारती, डॉ. गोकुळ वामन, डॉ. रवींद्र निमसे, प्रभात अंत्रे आणि लक्ष्मण गागरे उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये तज्ज्ञांनी विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. पंडित खर्डे यांनी ‘फुले समृद्ध गाव’ या संकल्पनेची उद्दिष्टे व महत्त्व विशद करून प्रास्ताविक केले. डॉ. दत्तात्रय पाचारणे यांनी रब्बी ज्वारी उत्पादन तंत्रज्ञानाची पंचसूत्री स्पष्ट करून अधिक उत्पादनासाठी आवश्यक बाबींची माहिती दिली. डॉ. महेश भारती यांनी हरभरा पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन व सुधारित पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. तसेच बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर करून शेतकऱ्यांना त्याचे महत्त्व पटवून दिले. डॉ. सचिन सदाफळ यांनी विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी विस्तार व शेतकरी हिताच्या उपक्रमांची माहिती दिली. सहाय्यक कृषी अधिकारी प्रभात अंत्रे यांनी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रगतशील शेतकरी लक्ष्मण गागरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय शेडगे यांनी केले तर आभार डॉ. सचिन सदाफळ यांनी मानले. प्रशिक्षणाच्या निमित्ताने उपस्थित शेतकऱ्यांना हरभरा व ज्वारीचे बियाणे तसेच आवश्यक कृषी निविष्ठांचे वाटप करण्यात आले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर, पीक व्यवस्थापनाचे शास्त्रीय नियोजन, सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब आणि उत्पादन खर्चात बचत करून अधिक उत्पादन मिळविण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *