Headlines

फटाक्यांमुळे अमरावतीचा एक्यूआय 285 वर:हवा पूर्ववत होण्यासाठी 3 ते 5 दिवस लागण्याचा तज्ज्ञांचा अंदाज




दिवाळीत फटाके उडवल्यामुळे अमरावतीतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २८५ वर पोहोचला. नेहमी तो ८० ते ९० दरम्यान असतो. हवा पूर्ववत होण्यासाठी ३ ते ५ दिवस लागू शकतात, असे हवामानतज्ज्ञ जितेंद्र पुरते यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) गेल्या २४ तासांतील नोंदींनुसार, रविवारी दिवाळीच्या दिवशी फटाके उडवल्यानंतर एक्यूआय रोजच्या तुलनेत १९५ ने वाढला. रात्री ८ ते ११ या वेळेत प्रदूषणात वाढ झाली. शेवटच्या तासाभरात ही वाढ अधिक दिसून आली. फटाक्यांच्या धुरासोबत नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि पीएम २.५ व पीएम १० हे सूक्ष्म कण हवेत साचले. त्यामुळे शहरात धुरकेसारखी स्थिती निर्माण झाली. एक्यूआय २०१ ते ३०० दरम्यान असल्यास हवा ‘वाईट’ श्रेणीत येते, असे एमपीसीबीचे निकष सांगतात. ० ते ५० चांगला, ५१ ते १०० समाधानकारक आणि १०१ ते २०० मध्यम श्रेणी मानली जाते. हवेतील प्रदूषणामुळे लहान मुले, वृद्ध आणि दम्यासारखे श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास, खोकला, घसा खवखवणे आणि डोळ्यांची जळजळ होऊ शकते. काही नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात जावे लागल्याचे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागल्याचे वृत्त आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडीची चाहूल लागते. या काळात वाऱ्याचा वेग कमी आणि तापमान कमी असल्याने जमिनीजवळचे धूलिकण व धूर हवेत अडकून राहतात. त्यामुळे प्रदूषण वरच्या थरात सहज पांगत नाही. जितेंद्र पुरते यांच्या मते, रविवारी झालेल्या आतषबाजीमुळे हवेत साचलेले सूक्ष्म कण आणि रसायने हळूहळू खाली बसतात आणि नैसर्गिक वाऱ्यामुळे पांगतात. वाऱ्याचा वेग अनुकूल असेल किंवा हलकी हवा सुटली, तर प्रदूषणाचा थर लवकर विरघळू शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *