Headlines

गोकुळच्या निवडणुकीत आमच्याकडून शशिकांत पाटलांचा फॉर्म:13 संचालकांचा पाठिंबा, पुढची रणनीती 24 तारखेलाच ठरेल- सतेज पाटील




‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होत आहे. या अत्यंत चुरशीच्या आणि कायदेशीर पेचात अडकलेल्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते आणि गोकुळमधील एका गटाचे नेतृत्व करणारे सतेज पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “आम्ही या निवडणूक प्रक्रियेत पूर्णपणे सहभागी होणार असून, आमच्या १३ संचालकांच्या वतीने शशिकांत पाटील चोयेकर यांचा अध्यक्षपदासाठी अर्ज भरला जाईल,” अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली. ‘आज निवडणूक आहे, पुढची रणनीती २४ लाच’ आजच्या निवडणुकीबाबत आपली रणनीती काय असणार? या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना सतेज पाटील म्हणाले, “माझी आता त्या निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे अशी भूमिका आहे. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया आता होऊ दे आणि मग त्यानंतर कळेल की निकाल लागल्यावर दुपारी काय घडतंय. आमची रणनीती वगैरे काय असा भाग नाही, आज इलेक्शन आहे. आमचे उमेदवार शशिकांत चोयेकर यांचा फॉर्म भरला गेला पाहिजे. कोर्टाने काल निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आत्ता रणनीतीचा विषय नाही, जी काही कायदेशीर रणनीती असेल ती उद्या २४ तारखेलाच ठरेल.” सुप्रीम कोर्टात जाणार का? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तुम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहात का? या प्रश्नावर थेट उत्तर देणे टाळत सतेज पाटील म्हणाले, “नाही, आज त्याच्यावर कोणतीही चर्चा नाही. न्यायालयात २४ तारखेला पुढील तारीख असल्यामुळे त्याच्यावर आज चर्चा नाही. आज फक्त बोर्डाची मीटिंग आणि चेअरमन निवड आहे. मतदान होईल आणि ही प्रक्रिया पूर्ण होईल.” ‘न्यायालयाचा सन्मान राखणे जबाबदारी’ काल राजू शेट्टींनी केलेल्या आवाहनाचा आणि शासनाच्या ४ नियुक्त संचालकांचा संदर्भ देत सतेज पाटील म्हणाले, “राजू शेट्टींनी काल जे आवाहन केले, त्यावेळी न्यायालयाचा निर्णय आला नव्हता. पण आता न्यायालयाचा निर्णय आलेला आहे. न्यायालयाचा सन्मान राखणे ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणूनच आम्ही प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.” तणावाच्या पार्श्वभूमीवर शांततेचे आवाहन गोकुळ शिरगाव परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, तणावपूर्ण वातावरण असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले, “तणावपूर्ण वगैरे असे काही नाही. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, त्यांनी शांततेने हे सगळं करायचे आहे. पोलिसांची जबाबदारी आहे आणि ते ती पार पाडतील.” सतेज पाटील यांनी शशिकांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घेण्याचे जाहीर केल्याने, आता ‘गोकुळ’चा राजा कोण ठरणार, याचा फैसला आज दुपारपर्यंत होण्याची शक्यता आहे. ————- हेही वाचा.. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान:समविचारी आघाडी की महायुती? गोकुळ चौकाला पोलिस छावणीचे स्वरूप; 700 पोलिसांचा बंदोबस्त
कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होत आहे. महायुतीकडून माजी आमदार राजेश पाटील, तर समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी दोन्ही गटांत थेट लढत होत असून, कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *