![]()
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड अखेर पार पडली असून, या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांनी बाजी मारली आहे. त्यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांचा पराभव केला. या निवडणुकीत राजेश पाटील यांना 16 मते, तर शशिकांत पाटील चुयेकर यांना 13 मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदावर महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजेश पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया देताना सर्व संचालक, नेते आणि दूध उत्पादकांचे आभार मानले. तसेच आगामी काळात गोकुळच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे, निवडणुकीत विरोधी भूमिका घेतलेल्या सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीच्या संचालकांनाही त्यांनी संस्थेच्या कामकाजात सहकार्य करण्याचे आवाहन केले. निवडणुकीतील राजकारण बाजूला ठेवून दूध उत्पादकांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चंदगडला 63 वर्षांनंतर गोकुळमध्ये प्रतिनिधित्व राजेश पाटील यांनी आपल्या निवडीचे महत्त्व अधोरेखित करताना चंदगड तालुक्याचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, तब्बल 63 वर्षांनंतर चंदगडसारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागाला गोकुळच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. हसन मुश्रीफ यांनी आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर जिल्हा दूध संघाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी आपण पूर्ण क्षमतेने पार पाडू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या नेत्यांनी एकत्रितपणे काम केले. पॅनलचे नेतृत्व करणारे मंत्री हसन मुश्रीफ, जिल्ह्याचे नेते चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार अमल महाडिक आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह अन्य नेत्यांच्या सहकार्यामुळे हा विजय मिळाल्याचे राजेश पाटील यांनी सांगितले. तसेच गोकुळशी जोडलेल्या सुमारे 5 लाख दूध उत्पादकांचे आणि जिल्ह्यातील जनतेचे त्यांनी आभार मानले. दूध उत्पादकांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गोकुळला राज्यातून देशपातळीवर नेण्याचा निर्धार गोकुळ ही महाराष्ट्रातील महत्त्वाची आणि नावाजलेली दूध संस्था आहे. या संस्थेचा विस्तार आणि लौकिक आणखी वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याचे राजेश पाटील यांनी सांगितले. आगामी वर्षभराच्या कालावधीत सर्व संचालकांना विश्वासात घेऊन दूध उत्पादकांचे हित जपण्याबरोबरच संस्थेचे आर्थिक आणि व्यावसायिक वैभव वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. गोकुळची ओळख केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देशपातळीवर निर्माण व्हावी, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मागील वर्षभरात संस्थेला झालेला तोटा भरून काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे नव्या अध्यक्षांसमोर संस्थेची आर्थिक स्थिती सुधारणे, दूध उत्पादकांना अधिक लाभ मिळवून देणे आणि व्यवसायाचा विस्तार करणे अशी महत्त्वाची आव्हाने असणार आहेत. सतेज पाटील गटाला हातात हात घालून काम करण्याचे आवाहन या निवडणुकीत महायुती आणि सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र, अध्यक्षपदाची निवड पूर्ण झाल्यानंतर आता राजकारण बाजूला ठेवून संस्थेच्या विकासासाठी एकत्र येण्याची भूमिका राजेश पाटील यांनी मांडली. विरोधी पॅनलकडून निवडणूक लढवलेल्या संचालकांनाही त्यांनी सहकार्याचे आवाहन केले. निवडणूक संपली असून अध्यक्षांची निवड न्यायालयाच्या आदेशानुसार झाली आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील मतभेद किंवा राजकीय संघर्ष पुढे न नेता दूध उत्पादकांच्या हिताच्या प्रश्नांवर एकत्र काम करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. “निवडणूक संपलेली आहे आणि चेअरमनची निवडही झालेली आहे. त्यामुळे आता इतर गोष्टी करण्यापेक्षा दूध उत्पादकांच्या हिताच्या गोष्टींसाठी तुम्ही आणि आम्ही हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. जे काही झाले ते विसरून जाऊया. एकदिलाने आणि एकमनाने गोकुळच्या हिताचे कार्य करूया. बाकीचे राजकारण बाजूला ठेवूया,” असे आवाहन राजेश पाटील यांनी विरोधी गटातील संचालकांना केले. दरम्यान, गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर राजेश पाटील यांनी दिलेल्या या पहिल्याच प्रतिक्रियेतून संस्थेच्या कारभारात सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. आता नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली गोकुळची आर्थिक स्थिती सुधारते का, दूध उत्पादकांना अधिक लाभ मिळतो का आणि विरोधी गटातील संचालक प्रत्यक्ष कामकाजात कितपत सहकार्य करतात, याकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हेही वाचा….. गोकुळच्या निकालानंतर शशिकांत पाटील संतापले:म्हणाले, लोकशाहीने आमचा विजय, ठोकशाहीने त्यांचा… कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारत समविचारी आघाडीला मोठा धक्का दिला. महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांनी शशिकांत पाटील यांचा 3 मतांनी पराभव केला. या निकालानंतर समविचारी आघाडीमध्ये नाराजीचे वातावरण असून, पराभूत उमेदवार शशिकांत पाटील यांनी मतदान प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘लोकशाहीने आमचा विजय झाला, तर ठोकशाहीने त्यांचा विजय झाला,’ अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तसेच शासननियुक्त संचालकांच्या मतदानावर आक्षेप घेत न्यायदेवतेवर विश्वास असल्याचे सांगितले. सविस्तर वाचा….
Source link
गोकुळच्या अध्यक्षपदी निवड होताच राजेश पाटलांचे सतेज पाटील गटाला आवाहन:म्हणाले, राजकारण बाजूला ठेवून एकदिलाने काम करूया