![]()
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर कोल्हापूरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ डोळे वटारले, तरी त्यांचे राजकीय साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल, असा इशारा दिला होता. त्यांच्या या विधानाला सतेज पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सरकारी पदाचा आणि सत्तेचा वापर करून धमक्या देऊ नका. ‘उद्ध्वस्त करतो, बघून घेतो’ अशा धमक्या माझ्याजवळ चालणार नाहीत. मीसुद्धा पाटील आहे, अशा शब्दांत त्यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावले. सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना थेट 2029 च्या विधानसभा निवडणुकीचे आव्हानही दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत एकमेकांविरोधात लढूया. कार्यकर्त्यांच्या ताकदीवर निवडणूक लढवूया. मात्र, सत्तेची भीती दाखवून धमक्या देण्याचा प्रयत्न करू नका. अशा धमक्या आम्ही सहन करणार नाही. कोल्हापूरची जनता आणि महाराष्ट्रही हे खपवून घेणार नाही, असे सतेज पाटील म्हणाले. ‘मला बंटी पाटील म्हणूनच लोकांच्या मनात राहायचे आहे’ चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वैयक्तिक टीकेलाही सतेज पाटील यांनी उत्तर दिले. ‘बंटीचा बंटी साहेब झाला नाही’, अशी टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर बोलताना सतेज पाटील म्हणाले की, मला लोकांच्या हृदयात बंटी पाटील म्हणूनच राहायचे आहे. साहेब होण्याची माझी इच्छा नाही. चंद्रकांतदादा मोठे होत आहेत; मात्र त्यांची वैचारिक पातळी खालावत चालली आहे, असा टोला त्यांनी लगावला. मी आणि चंद्रकांतदादा गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात राजकीय लढाई लढत आहोत. राजकीय मतभेद असणे वेगळे आणि वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणे वेगळे. स्वर्गीय डॉ. डी. वाय. पाटील यांच्याबद्दल बोलून चंद्रकांत पाटील यांनी काय मिळवले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राजकीय संघर्षात वैयक्तिक टीका करण्याऐवजी विकासाच्या आणि जनतेच्या प्रश्नांवर बोलले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. हसन मुश्रीफांवर निशाणा; ‘शासकीय यंत्रणेचा वापर कसा होतो हे दाखवून दिले’ या वेळी सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही निशाणा साधला. गोकुळच्या निवडणुकीतील घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी शासकीय यंत्रणेच्या वापरावर प्रश्न उपस्थित केले. वटहुकूम काढून एखाद्या सहकारी संस्थेची सत्ता कशी मिळवता येऊ शकते, हे हसन मुश्रीफ यांनी दाखवून दिले आहे, अशी टीका त्यांनी केली. 2014 मध्ये उमेश आपटे यांनी मदत केली नसती, तर काय परिस्थिती निर्माण झाली असती, याची आठवण हसन मुश्रीफ यांनी ठेवावी, असेही सतेज पाटील म्हणाले. समविचारी संचालकांना दिले जाणारे इशारे आणि शासकीय व्यवस्थेच्या वापराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. सहकारी संस्थांच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप होऊ नये, यासाठीच आम्ही विरोध करत होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. धनंजय महाडिकांना प्रत्युत्तर; भीमा कारखान्याचा मुद्दा उपस्थित भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या टीकेलाही सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. महाडिक यांनी दुसऱ्यांवर टीका करण्याऐवजी आधी स्वतःच्या भीमा साखर कारखान्याकडे लक्ष द्यावे, असा टोला त्यांनी लगावला. धनंजय महाडिक यांनी आधी भीमा साखर कारखान्यावर एक फेरी मारून यावी आणि तो कारखाना सुरळीत चालवावा. तेथील कामगारांचे पगार होत नाहीत, कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली आहे. त्यामुळे दुसऱ्यांवर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या कारखान्याची परिस्थिती पाहावी, असे सतेज पाटील म्हणाले. महायुतीच्या नेत्यांना नुकताच काढलेला मोर्चा चांगलाच जिव्हारी लागला आहे. या मोर्चाला लोक येणार नाहीत, असे काही नेते सांगत होते. मात्र, अन्यायाविरोधात लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि त्यांनी विरोधकांना उत्तर दिले, असा दावाही त्यांनी केला. ‘आमचे 13 उमेदवार निवडून आले, न्यायालयात बाजू मांडणार’ गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील वादावर बोलताना सतेज पाटील यांनी न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. आमचे 13 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे आम्ही न्यायालयात आमची बाजू ठामपणे मांडणार आहोत, असे ते म्हणाले. शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या चार संचालकांच्या नियुक्तीवरही त्यांनी आक्षेप घेतला. केवळ गोकुळची सत्ता मिळवण्यासाठी सरकारने चार संचालकांची नियुक्ती केल्याचा आरोप त्यांनी केला. या नियुक्त्या केवळ अध्यक्षपदाच्या निवडीपुरत्या करण्यात आल्या होत्या, असा दावाही त्यांनी केला. या चार संचालकांना सहा महिन्यांचा अनुभव असल्याची कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप करत, चार महिन्यांनंतर हे संचालक राहणार नाहीत, अशी माहिती आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. बहुमत असतानाही सरकारने चार संचालकांची नियुक्ती का केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मिटवून घेण्याची भूमिका मांडली होती; मात्र धनंजय महाडिक यांनी तसे होणार नसल्याचे सांगितले. या माध्यमातून आम्हाला गाफील ठेवण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही सतेज पाटील यांनी केला. नियुक्त केलेल्या चार संचालकांची मते वेगळी ठेवण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘मला कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही’ या संपूर्ण राजकीय संघर्षादरम्यान सतेज पाटील यांनी आपल्या राजकीय भूमिकेबाबतही स्पष्टीकरण दिले. आतापर्यंत सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला कोणतीही वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षा नाही, असे ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला मुख्यमंत्री व्हायचे असल्याचे म्हटल्याचा उल्लेख करत, त्यांच्या या विधानामुळे आपल्याला बरे वाटल्याची मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. तसेच, चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवले, असेही ते म्हणाले. एकूणच, गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर सुरू झालेला राजकीय संघर्ष आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या ‘साम्राज्य उद्ध्वस्त करण्याच्या’ विधानाला सतेज पाटील यांनी थेट आव्हान देत 2029 मध्ये निवडणुकीच्या मैदानात सामना करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आगामी काळात कोल्हापूरमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. हेही वाचा…. ‘मुख्यमंत्र्यांनी मनात आणले तर एका दिवसात साम्राज्य उद्ध्वस्त होईल’:चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुतीच्या नेत्यांना लक्ष्य केले असताना, आता भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 2019 मध्ये राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू असताना बंटी पाटील यांनी काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांना फोनवरून धमकावल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. यासंदर्भात आपल्याकडे कॉल रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय सतेज पाटील यांच्या संपत्तीबाबत प्रश्न उपस्थित करत तिची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. सविस्तर वाचा….
Source link
‘उद्ध्वस्त करतो, बघून घेतो’ अशा धमक्या चालणार नाहीत:मी सुद्धा पाटील’, सतेज पाटलांचा चंद्रकांत पाटलांना इशारा