![]()
मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नसल्याने एका कुटुंबावर रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेतील मोहणे परिसरात समोर आली आहे. वसीमुन निसा काझी (वय 60) यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या दफनविधीसाठी कुटुंबीयांना तब्बल 8 तास प्रतीक्षा करावी लागली. उल्हासनगर येथील कब्रस्तानात दफनविधीस नकार मिळाल्यानंतर नातेवाईकांनी कल्याणमधील टेकडी कब्रस्तानातही प्रयत्न केला. मात्र, तेथेही दफनविधी करण्यास परवानगी नाकारल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे अंत्यविधी नेमका कुठे करायचा, असा प्रश्न कुटुंबीयांसमोर निर्माण झाला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अखेर कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या बंगल्यासमोर मृतदेह घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अंत्ययात्रा आयुक्तांच्या बंगल्याच्या दिशेने निघाली. मात्र, प्रेम ऑटो परिसरात पोलिसांनी नातेवाईकांना अडवले. यानंतर संतप्त कुटुंबीयांनी मृतदेह वाहनात ठेवून कल्याण नगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने अखेर रस्त्यावर उतरावे लागल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली. दोन कब्रस्तानांतूनही नकार मिळाल्याचा आरोप मिळालेल्या माहितीनुसार, मोहणे परिसरातील वसीमुन निसा काझी यांचे निधन झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या दफनविधीसाठी उल्हासनगर येथील कब्रस्तानात संपर्क साधला. मात्र, तेथे दफनविधीस नकार देण्यात आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यानंतर त्यांनी कल्याण पश्चिमेतील टेकडी कब्रस्तान गाठले. तेथेही दफनविधीची व्यवस्था होऊ शकली नाही. एकामागून एक ठिकाणी नकार मिळाल्याने कुटुंबीयांची धावपळ सुरू झाली. दरम्यान, वेळ निघून जात असतानाही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने नातेवाईकांमध्ये अस्वस्थता आणि संताप वाढत गेला. आयुक्तांच्या बंगल्याकडे अंत्ययात्रा, पोलिसांनी अडवले प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुटुंबीयांनी थेट केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या बंगल्यासमोर मृतदेह घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी प्रेम ऑटो परिसरातच अंत्ययात्रा रोखली. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह घेऊन जाणारे वाहन रस्त्यावरच थांबवले आणि रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला. मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठीही जागा मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे, असा सवाल नातेवाईकांकडून उपस्थित करण्यात आला. रात्रीपर्यंतही तोडगा नाही; प्रशासनाशी चर्चा सुरू दरम्यान, रात्री 7 वाजेपर्यंतही दफनविधीचा प्रश्न सुटलेला नव्हता. सुमारे दीड तासांपासून अंत्ययात्रा रस्त्यावर थांबून असल्याने कुटुंबीयांचा संताप अधिकच वाढला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू करण्यात आली. मृतदेहाच्या दफनविधीसाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याबाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, रात्री उशिरापर्यंत या प्रश्नावर ठोस निर्णय झालेला नव्हता. एरवी मृत्यूनंतर अंत्यविधीची प्रक्रिया सन्मानाने आणि शांततेत पार पडावी, अशी प्रत्येक कुटुंबाची अपेक्षा असते. मात्र, दफनविधीसाठी जागा मिळत नसल्याने कुटुंबीयांना अनेक तास मृतदेहासह प्रतीक्षा करावी लागल्याने या घटनेने महापालिकेच्या अंत्यविधी व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. हेही वाचा…. ‘उद्ध्वस्त करतो, बघून घेतो’ अशा धमक्या चालणार नाहीत:मी सुद्धा पाटील’, सतेज पाटलांचा चंद्रकांत पाटलांना इशारा गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर कोल्हापूरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ डोळे वटारले, तरी त्यांचे राजकीय साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल, असा इशारा दिला होता. त्यांच्या या विधानाला सतेज पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सरकारी पदाचा आणि सत्तेचा वापर करून धमक्या देऊ नका. ‘उद्ध्वस्त करतो, बघून घेतो’ अशा धमक्या माझ्याजवळ चालणार नाहीत. मीसुद्धा पाटील आहे, अशा शब्दांत त्यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावले. सविस्तर वाचा…..
Source link
कल्याणमध्ये दफनविधीसाठी जागा मिळेना:8 तासांपासून मृतदेह प्रतीक्षेत, संतप्त नातेवाईकांचा रास्ता रोको