![]()
दिवाळीचा सण म्हटला की आनंद, उत्साह आणि कुटुंबासोबत साजरे होणारे क्षण आठवतात. मात्र, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गावापासून दूर राहून ऊसाच्या फडात राबणाऱ्या ऊसतोड कामगारांना अनेकदा सणही कामाच्या ठिकाणीच साजरे करावे लागतात. अशा कष्टकरी कामगारांच्या आनंदात सहभागी होत राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी भाऊबीजेच्या दिवशी मुळशी तालुक्यातील कासारसाई-दारुंब्रे येथील संत तुकाराम साखर कारखान्याच्या परिसरातील ऊसतोड कामगारांच्या पालावर भेट दिली. यावेळी त्यांनी कामगारांसोबत भाऊबीज साजरी करत त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस केली. विशेष म्हणजे, पालावर चुलीवर स्वयंपाक करून त्यांनी कामगारांसोबत स्नेहभोजनाचाही आनंद घेतला. त्यांच्या या आपुलकीच्या भेटीमुळे कामगारांच्या पालावर दिवाळीचा उत्साह द्विगुणित झाला. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे रोजगाराच्या शोधात अनेक ऊसतोड कामगारांना आपली गावे सोडून कुटुंबासह कारखान्यांच्या परिसरात स्थलांतर करावे लागते. ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता हे कामगार ऊसतोडीचे कठीण काम करतात. अशा कामगारांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा पंकजा मुंडे यांनी यंदाही कायम ठेवली. भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांनी कामगारांच्या पालावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी कामगारांच्या वतीने त्यांना साडीचोळीची ओवाळणी भेट देण्यात आली. तसेच त्यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. ‘ऊसतोड कामगारांच्या कष्टाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील’ यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, दरवर्षी आपण कष्टकरी कामगारांसोबत दिवाळी साजरी करत असतो. काही दिवसांपूर्वी अवघ्या 22 वर्षांच्या ऊसतोड कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समजली. हे ऐकून मन सुन्न झाले. ऊसतोड कामगारांचे जीवन अत्यंत कष्टाचे असून, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी मदत मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांच्या कष्टाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील आहोत. कामगारांनी आपल्या अडीअडचणी आणि समस्या मोकळेपणाने मांडाव्यात. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कामगारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आमदार सुनील शेळके यांनीही केले कौतुक यावेळी आमदार सुनील शेळके यांनी पंकजा मुंडे यांच्या भेटीचे कौतुक केले. सर्वसामान्य कष्टकरी आणि कामगारांच्या पाठीशी ताईसाहेब नेहमीच उभ्या राहत असतात. ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणे, ही खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केल्यासारखी बाब आहे, असे ते म्हणाले. पालावर स्वागतासाठी कामगारांची जय्यत तयारी पंकजा मुंडे पालावर येणार असल्याचे समजताच ऊसतोड कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या स्वागतासाठी कामगारांनी स्वतःहून जय्यत तयारी केली होती. पालासमोर सडा टाकून आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. पारंपरिक बंजारा लोकगीतांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. चिमुकल्यांना नवीन कपडे घालून सजवण्यात आले होते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी भोजनाची पूर्वतयारी करण्यात आली होती. तसेच परिसराची स्वच्छताही करण्यात आली होती. कामगारांनी केलेल्या या उत्स्फूर्त स्वागतामुळे पालावर सणासुदीचे वातावरण पाहायला मिळाले. कामगारांनी व्यक्त केला आनंद पंकजा मुंडे यांच्या भेटीमुळे ऊसतोड कामगारांनी समाधान व्यक्त केले. माणेवाडी (जि. अहिल्यानगर) येथील कुंडलिक बडे म्हणाले की, मंत्री पंकजा मुंडे ताई आपल्या पालावर येणार असल्याचे समजल्यापासून सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही उत्सुकतेने तयारी केली होती. तर बीड जिल्ह्यातील आष्टी येथील नवनाथ भोसले म्हणाले की, पंकजा ताई पालावर आल्या, त्यांनी आमच्यासोबत भाऊबीज साजरी केली, फराळ केला आणि महिलांना साडीचोळीचे वाटप केले. हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. या भेटीदरम्यान आमदार सुनील शेळके, संत तुकाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले, उपाध्यक्ष, संचालक, शेतकी अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार उपस्थित होते. हेही वाचा…. कर्जतमधील वृक्षतोडीवर सयाजी शिंदेंची टीका:पंकजा मुंडेंचे प्रत्युत्तर, म्हणाल्या, मी बॉटनी ऑनर्स आहे कर्जतच्या सायडोंगर परिसरातील टोरंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून वातावरण तापले आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या ज्ञानावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुंडेंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ‘पर्यावरणाच्या प्रश्नांची मला पूर्ण जाणीव असून, मी बॉटनी ऑनर्स आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा….
Source link
भाऊबीजेला पंकजा मुंडेंची ऊसतोड कामगारांच्या पालावर हजेरी:चुलीवर केला स्वयंपाक, कामगारांसोबत साजरी केली दिवाळी