Headlines

रील बनवण्याच्या नादात हातातच फुटला स्काय शॉट:21 वर्षीय तरुणाच्या हाताला 72 टाके, साडेपाच तास शस्त्रक्रिया




सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि रीलला अधिकाधिक लाईक्स मिळावेत, यासाठी तरुणांकडून वेगवेगळे प्रयोग केले जात असल्याचे पाहायला मिळते. मात्र, काही सेकंदांच्या व्हिडीओसाठी जीव धोक्यात घालण्याचे प्रकारही समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार वसईमध्ये घडला आहे. इन्स्टाग्रामसाठी हटके रील तयार करण्याच्या प्रयत्नात एका 21 वर्षीय तरुणाच्या हातातच स्काय शॉट फटाका फुटला. या दुर्घटनेत तरुणाचा हात गंभीररीत्या जखमी झाला असून, त्याच्या हाताला तब्बल 72 टाके घालावे लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विनीत कुमार (वय 21) हा तरुण वसईतील मधुबन बिल्डिंग परिसरात काम करतो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांची आतषबाजी आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याचे प्रमाण वाढले आहे. याचदरम्यान विनीतलाही इन्स्टाग्रामवर हटके रील बनवण्याची इच्छा झाली. नेहमीपेक्षा वेगळा आणि आकर्षक व्हिडीओ तयार करण्याच्या प्रयत्नात त्याने स्काय शॉट फटाका हातात धरून पेटवण्याचा निर्णय घेतला. मात्र, फटाका पेटवल्यानंतर काही क्षणांतच त्याचा स्फोट झाला. आकाशात उडण्याऐवजी स्काय शॉट थेट विनीतच्या हातातच फुटला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर जखमी विनीतला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. साडेपाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर हात वाचवण्यात यश विनीतच्या हाताला झालेली दुखापत अत्यंत गंभीर होती. त्यामुळे डॉक्टरांसमोर त्याचा हात वाचवण्याचे मोठे आव्हान होते. वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल साडेपाच तास शस्त्रक्रिया सुरू होती. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करत त्याच्या हातावरील जखमांवर उपचार केले. या दुर्घटनेत त्याच्या हाताला तब्बल 72 टाके घालावे लागले. अखेर डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्याचा हात वाचवण्यात यश आले. काही सेकंदांच्या रीलसाठी आयुष्यभराची जखम सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याची स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे. अधिकाधिक व्ह्यूज, लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी काही जण धोकादायक स्टंट करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. मात्र, अशा प्रकारचे प्रयोग किती महागात पडू शकतात, याची जाणीव या घटनेतून पुन्हा एकदा झाली आहे. काही सेकंदांचा व्हिडीओ तयार करण्याच्या नादात विनीतला गंभीर दुखापत सहन करावी लागली. दरम्यान, फटाके फोडताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. फटाके हातात धरून पेटवणे, रॉकेट किंवा स्काय शॉटसारखे फटाके चुकीच्या दिशेने सोडणे असे प्रकार टाळणे गरजेचे आहे. फटाके नेहमी सुरक्षित आणि मोकळ्या जागेत योग्य अंतर ठेवूनच पेटवावेत. सोशल मीडियावरील प्रसिद्धी आणि लाईक्सपेक्षा स्वतःचा जीव अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे रील बनवण्यासाठी धोकादायक स्टंट करू नयेत, असे आवाहन करण्यात येत आहे. हेही वाचा….. जशी वेळ येईल, तशा गोष्टी तुम्हाला कळतील:राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे सूचक विधान राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या सर्व चर्चांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अतिशय सूचक विधान केले आहे. “जशी वेळ येईल, तशा गोष्टी तुम्हाला कळतील,” असे त्या म्हणाल्या आहे. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *