Headlines

शेतकरी आणि मेंढपाळांच्या प्रश्नावर लवकरच उभारणार मोठं आंदोलन उभारणार:रोहित पवारांचा राज्य सरकारला इशारा




राज्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी आणि विशेषतः धनगर-मेंढपाळ समाज चाऱ्याच्या शोधात वणवण भटकत आहे. याच प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आता आक्रमक झाले आहेत. शेतकरी आणि मेंढपाळांना घरपोच चारा मिळावा, या मागणीसाठी येणाऱ्या काळात राज्य सरकारविरोधात एक मोठे आंदोलन उभारणार असल्याची मोठी घोषणा रोहित पवार यांनी केली आहे. तसेच, राज्यातील बलाढ्य सत्तेशी लढण्यासाठी आम्हाला ताकद मिळू दे, असे साकडंही त्यांनी श्री बाबीर बुवांच्या चरणी घातले आहे. ‘बलाढ्य शक्तीशी लढण्यासाठी बळ मिळू दे’ श्री बाबीर बुवांच्या दर्शनासाठी गेले असता रोहित पवार यांनी भावुक आणि आक्रमक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “राज्यातील सरकारच्या समोर, या बलाढ्य राजकीय शक्तीच्या समोर लढण्याची आम्हाला शक्ती मिळावी, अशी मी इथं श्री बाबीर बुवांच्या चरणी प्रार्थना करत आहे. आम्हाला बळ मिळो आणि त्या बळाचा आम्ही उपयोग हा फक्त आणि फक्त सामान्य लोकांसाठी करू, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.” मेंढपाळांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि चाऱ्याच्या टंचाईवर बोट ठेवत रोहित पवार म्हणाले, “सध्या दुर्दैवाने राज्यात दुष्काळाचा काळ असल्यामुळे जनावरांना चारा कुठेही मिळत नाहीये. त्यामुळे सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचायला हवा. धनगर आणि मेंढपाळ बंधू-भगिनींसाठी यापूर्वी मेंढी योजना आणली होती. आदरणीय शरद पवार साहेबांनीसुद्धा मेंढपाळांचा हा मुद्दा सरकारपर्यंत नेलेला आहे.” ‘घरपोच चाऱ्यासाठी मोठं आंदोलन उभारणार’ राज्य सरकारला थेट इशारा देताना रोहित पवार यांनी मोठ्या आंदोलनाची हाक दिली आहे. ते म्हणाले, “येणाऱ्या काळामध्ये एक मोठं आंदोलन आम्ही उभं करतोय. यात शेतकरी आणि शेतमजुरांचा मुद्दा तर आहेच, पण आमच्या धनगर आणि मेंढपाळ बंधू-भगिनींचासुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. या मेंढपाळ बांधवांना घरपोच चारा हा मिळालाच पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे.” रोहित पवार यांच्या या घोषणेमुळे आगामी काळात राज्यातील दुष्काळ आणि चाऱ्याच्या प्रश्नावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात मोठा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. मेंढपाळांच्या प्रश्नाला थेट हात घालत रोहित पवारांनी आता रान उठवण्याची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. ————- हेही वाचा.. इडा-पिडा जाऊ दे, भाऊ माझा मंत्री होऊ दे: परळीच्या मंचावरून सुषमा अंधारेंच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, राजकीय वर्तुळात चर्चा रंगली
राजकारणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे नेते जेव्हा एकाच मंचावर येतात, तेव्हा काहीतरी वेगळेच राजकीय रंग पाहायला मिळतात. असाच एक प्रसंग परळीत पाहायला मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि आमदार धनंजय मुंडे एकाच मंचावर आले होते. यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी धनंजय मुंडे यांना थेट मंत्रीपदाच्या आणि ‘भावाचं राज्य येऊ दे’ अशा अनोख्या शुभेच्छा दिल्या, ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *