पुण्यात जहांगीर हॉस्पिटलच्या हिराबाई कावसजी जहांगीर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटअंतर्गत कार्यरत स्वीटलिंग्ज सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर टाइप 1 डायबिटीसतर्फे 14 ते 21 नोव्हेंबरदरम्यान जनजागृती आणि मोफत मधुमेह जोखीम तपासणी अभियान राबवण्यात येणार आहे. जागतिक मध
.
स्वीटलिंग्ज सेंटरच्या संचालिका आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. अनुराधा खाडिलकर व डॉ. वामन खाडिलकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जहांगीर रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जनसंपर्क अधिकारी आरती इराणी, वैद्यकीय अधिकारी दीपाली लडकत, स्वीटलिंग्ज सेंटरचे प्रकल्प प्रमुख मोहनीश वाघ आणि जनसंपर्क अधिकारी नीरज रासकर उपस्थित होते.
डॉ. अनुराधा खाडिलकर यांनी सांगितले की, 2026-27 या वर्षासाठी जागतिक मधुमेह दिनाची संकल्पना ‘मधुमेहावर वेळीच कृती’ अशी आहे. मधुमेहाचे लवकर निदान आणि जोखीम कमी करण्यासाठीच्या उपायांचे महत्त्व या अभियानातून सांगितले जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या (आयडीएफ) अंदाजानुसार, 2050 पर्यंत जगभरातील मधुमेह असलेल्या प्रौढांची संख्या 85 कोटी 30 लाखांपर्यंत पोहोचू शकते. लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये टाइप 1 मधुमेहाचा धोका वाढत आहे. भारतात 20 वर्षांखालील सुमारे तीन लाख एक हजार मुले आणि किशोरवयीन मुलांना टाइप 1 मधुमेह आहे. हा आकडा जगात सर्वाधिक आहे.
टाइप 1 मधुमेहात शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करते. त्यामुळे शरीरात इन्सुलिन कमी तयार होते किंवा तयार होणे बंद होते. या रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन घ्यावे लागते. जीवनशैलीत बदल करून हा आजार टाळता येत नाही. टाइप 2 मधुमेहात शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही, असे डॉ. अनुराधा खाडिलकर यांनी सांगितले.

डॉ. वामन खाडिलकर यांनी सांगितले की, अतितहान लागणे, वारंवार लघवी होणे, विनाकारण वजन कमी होणे आणि सतत थकवा जाणवणे ही मधुमेहाची प्रमुख लक्षणे आहेत. लहान मुलांमध्ये अंथरुण ओले करणे पुन्हा सुरू होणे, भूक वाढणे, अशक्तपणा आणि हालचाली कमी होणे ही लक्षणेही दिसू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर गुंतागुंत होऊ शकते.
अभियानात पुण्यातील सार्वजनिक उद्याने आणि पोलिस कर्मचाऱ्यांसाठी तपासणी व जनजागृती उपक्रम घेतले जातील. रक्तातील साखर तपासणे, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) आणि कंबरेचा घेर मोजणे यांचा त्यात समावेश असेल. आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत तज्ज्ञ मार्गदर्शनही करतील.