![]()
वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752-I वरील धोकादायक वळणावर अपघातांची मालिका सुरूच आहे. गुरुवारी पहाटे उगले वस्ती जवळील वळणावर टमाट्यांची वाहतूक करणारा आयशर ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला असून वाहनाचे आणि त्यातील टमाट्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, महामार्गावरील धोकादायक वळणे आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. नाशिक येथून बिडकीनच्या दिशेने टमाट्यांची वाहतूक करणारा आयशर ट्रक (क्र. एमएच 16 केएस 1304) गुरुवारी पहाटे बोर दहेगाव येथील उगले वस्ती जवळ आला असता हा अपघात घडला. चालकाला प्रवासादरम्यान झोपेची डुलकी लागल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली. मात्र, ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ट्रकमधील टमाटे रस्त्यावर आणि परिसरात विखुरले गेले. त्यामुळे महामार्गावर सर्वत्र टमाट्यांचा लाल चिखल झाल्याचे चित्र दिसत होते. दोन किलोमीटरमध्ये तीन धोकादायक वळणे बोर दहेगाव ते करंजगाव या अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरात राष्ट्रीय महामार्गावर तीन धोकादायक वळणे आहेत. यातील पहिले वळण बोर दहेगाव येथील न्यू हायस्कूलजवळ, दुसरे उगले वस्ती जवळ, तर तिसरे करंजगाव परिसरातील परसोडा फाट्याजवळ आहे. विशेष म्हणजे परसोडा फाट्याजवळील वळण चंद्राकार असल्याने या ठिकाणी वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण जाते. या तिन्ही वळणांवर यापूर्वीही अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. काही अपघातांमध्ये नागरिकांना जीव गमवावा लागला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी ही वळणे धोकादायक ठरत आहेत. वारंवार अपघात होऊनही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात येत नसल्याने स्थानिक नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिशादर्शक फलक, रेडियम पट्ट्यांचा अभाव नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वैजापूर ते लासूर स्टेशन या मार्गावर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक आणि रस्त्याच्या कडेला रेडियम प्लेट्स नसल्याची तक्रार वाहनचालकांकडून केली जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या सुमारास धोकादायक वळणांचा अंदाज वाहनचालकांना वेळेत येत नाही. परिणामी वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता वाढते. गावालगतचे रस्ते, चौक आणि धोकादायक वळणे असलेल्या ठिकाणी आवश्यक गतिरोधक, सूचना फलक तसेच रस्त्यावर काळे-पिवळे किंवा पांढरे सुरक्षा पट्टे आखण्यात आलेले नसल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहनचालकांना वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक सूचना मिळत नाहीत. या मार्गावरून अवजड वाहनांचीही मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत सुरक्षा उपाययोजनांचा अभाव अधिकच धोकादायक ठरत आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांची मागणी बोर दहेगाव ते करंजगावदरम्यान असलेल्या तिन्ही धोकादायक वळणांवर तातडीने दिशादर्शक फलक, रेडियम सूचना फलक आणि आवश्यक सुरक्षा पट्टे लावण्यात यावेत. तसेच वैजापूर ते लासूर स्टेशन या संपूर्ण मार्गाची पाहणी करून अपघातप्रवण ठिकाणी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आणखी एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक कामे पूर्ण करावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हेही वाचा… सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा अपघात:धावपट्टीवरून घसरून पुढील चाक निखळले, महिला वैमानिक बचावली सोलापूर विमानतळावर गुरुवारी दुपारी शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. उड्डाणासाठी धावपट्टीवर वेग घेत असताना विमानावरील नियंत्रण सुटल्याने ते धावपट्टीच्या बाजूला असलेल्या कच्च्या जागेत घसरले. या दुर्घटनेत विमानाचे पुढील चाक निखळले असून विमान एका बाजूला कलंडले. मात्र, विमानात असलेल्या महिला प्रशिक्षणार्थी वैमानिकाचा जीव सुदैवाने वाचला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून वैमानिक सुखरूप असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सविस्तर वाचा….
Source link
धोकादायक वळणावर टमाट्याचा ट्रक पलटी:चालक जखमी, बोर दहेगाव परिसरात अपघातांची मालिका सुरूच