![]()
भाऊबीज म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या अतूट जिव्हाळ्याचे व निःस्वार्थ प्रेमाचे प्रतीक. याच पवित्र नात्याचा आणि आध्यात्मिक आविष्कार भाऊबीजेच्या मंगल पर्वावर अनुभवायला मिळाला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आपेगाव येथून मुक्ताई मातेस माहेरच्या वतीने पारंपरिक पद्धतीने साडी-चोळी अर्पण करून विधिवत महाभिषेक करण्यात आला. पहाटे चार ते सात या ब्राह्ममुहूर्ताच्या पवित्र वेळेत पार पडलेल्या या सोहळ्याने उपस्थित भाविकांना भाऊबीजेच्या परंपरेतील एक आगळावेगळा आणि हृदयाला भिडणारा आध्यात्मिक अनुभव दिला. हा संपूर्ण सोहळा गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. मुक्ताई मातेच्या माहेराहून दरवर्षी साडी-चोळी अर्पण करण्याची शेकडो वर्षांची परंपरा जपत, मोठ्या भक्तिभावाने आणि वैदिक मंत्रोच्चारात महाभिषेक करण्यात आला. आपेगाव प्रमाणेच मुक्ताई मातेच्या इतर प्रमुख संस्थानांमध्येही भाऊबीजेचा हा उत्सव तितक्याच उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने श्री संत मुक्ताईमाता संस्थान, मेहुण येथे रामराव महाराज मेहुणकर यांच्या उपस्थितीत सूर्यकांत काळे यांनी सपत्नीक मुक्ताई मातेला साडी-चोळी अर्पण करून महाभिषेक केला. या सोहळ्यास ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, योगेश महाराज सोन्ने, योगेश महाराज गलधर, राम महाराज तांबे, जिजाभाऊ मिसाळ, तुषार मिसाळ, सूर्यकांत काळे, ओंकार काळे, राजू सावंत, मनोहर थोरात, ज्ञानेश्वर मिसाळ, तात्यासाहेब मोरे, लक्ष्मण कोल्हे, आप्पासाहेब काशीद, किशोरभाऊ खोडपे, विवेक कुमावत, रवींद्र महाराज हरणे, ज्ञानेश्वर हरणे आदी उपस्थित होते. मुक्ताई मातेच्या तिन्ही संस्थानांत सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात श्री संत मुक्ताई संस्थान, कोथळी येथे उद्धव महाराज यांच्या उपस्थितीत राजू सावंत यांनी सपत्नीक साडी-चोळी अर्पण करून महाभिषेक पार पाडला. विष्णू महाराज कोल्हापूरकर यांच्या स्नेहपूर्ण आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने मुक्ताई मातेच्या या तिन्ही संस्थानांमध्ये हा परंपरागत सोहळा दिमाखात संपन्न झाला. भाऊबीजेच्या निमित्ताने माहेरच्या भावाने आपल्या लाडक्या बहिणीला साडी-चोळी अर्पण करण्याच्या या भावस्पर्शी परंपरेतून भक्ती, श्रद्धा आणि बहीण-भावाच्या शाश्वत प्रेमाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
Source link
भाऊबीज सणानिमित्ताने आपेगावमधून मुक्ताई मातेला माहेरच्या साडीची भेट:आपेगावसह मुक्ताईनगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन