Headlines

नेहरू जयंतीनिमित्त काँग्रेस भवनात व्याख्यान:शिक्षण, विज्ञान आणि लोकशाहीतील योगदानावर प्रा. विशाल पतंगे मांडणार विचार




आधुनिक आणि समृद्ध भारताच्या उभारणीत मोलाचे योगदान देणारे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी शनिवारी (१४ नोव्हेंबर) काँग्रेस भवन येथे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आधुनिक भारताच्या उभारणीत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान’ या विषयावर प्रा. विशाल रावसाहेब पतंगे मार्गदर्शन करणार आहेत. स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीत नेहरू यांनी शिक्षण, विज्ञान, औद्योगिकीकरण, लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांना दिलेले महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक भारताच्या प्रगतीची त्रिसूत्री असलेल्या शिक्षण, विज्ञान आणि लोकशाही या विषयांवर यावेळी विचारमंथन होणार आहे.प्रा. विशाल रावसाहेब पतंगे हे नांदेड येथील पीपल्स कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अध्यापनासोबतच साहित्य, वक्तृत्व आणि सामाजिक-वैचारिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. प्रभावी वक्ते आणि अभ्यासू साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे. साहित्यिक कार्यक्रम, काव्यमैफिली तसेच विविध सामाजिक विषयांवरील व्याख्यानांतून ते विचारांची मांडणी करतात. स्व. प्राचार्य रावसाहेब पतंगे यांचे ते सुपुत्र आहेत. वसमत येथील शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांच्या वडिलांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. वडिलांच्या नावाने वसमत येथे रावसाहेब पतंगे महाविद्यालय कार्यरत आहे. वडिलांचा शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचे काम प्रा. विशाल पतंगे करीत आहेत. शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनात हा कार्यक्रम होईल. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. पुणे पूर्व शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप आणि पुणे पश्चिम शहर काँग्रेसच्या अध्यक्षा दीप्ती चौधरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसच्या सिव्हिल सोसायटी, पॉलिसी अँड रिसर्च विभागाच्या महाराष्ट्र राज्यप्रमुख जिविका उठडा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नेहरूंच्या विचारांचा समकालीन भारताच्या संदर्भात वेध घेणे आणि त्यांच्या योगदानाविषयी नव्या पिढीमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा या व्याख्यानाचा उद्देश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *