![]()
पाटण तालुक्यातील तारळी धरणावर सुरू असलेल्या अदानी ग्रीन एनर्जीच्या ‘तारळी पंप स्टोरेज’ प्रकल्पाला अभिनेते सयाजी शिंदे आणि विवेकानंद पाटील यांनी रविवारी भेट देऊन पाहणी केली. खर्चातील तफावत, मोठ्या प्रमाणावरील उत्खनन आणि वृक्षतोडीमुळे हा प्रकल्प सध्या तीव्र वादात सापडला असून त्याला स्थानिकांकडून मोठा विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत बोलताना सयाजी शिंदे व विवेकानंद पाटील यांनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. पर्यावरणाचे नुकसान करणारे प्रकल्प सह्याद्रीवर लादणार असाल तर याच सह्याद्रीच्या खोऱ्यात अफजलखानाचा कोथळा काढला होता, हा इतिहास लक्षात ठेवा, असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला. महाराष्ट्र सरकारची धोरणे नपुंसक असून फायद्याचे व मोठे प्रकल्प गुजरातला आणि पर्यावरणाचे नुकसान करणारे प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारले जात आहेत, असा घणाघात करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच, सह्याद्री डोंगर रांगेत तारळी पंप स्टोरेजसारखे आणखी 23 प्रकल्प प्रस्तावित असून, हे प्रकल्प हद्दपार केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी सरकारला ठणकावले. या प्रकल्पाचा खर्च हजारो कोटींनी कमी दाखवून अदानी आणि सरकारकडून फसवणूक करण्यात आली आहे. उत्खनन आणि झाडे तोडण्यासह अनेक गोष्टींचे इथे उल्लंघन झाले असून, याविरोधात रविवारी रात्रीच तारळी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती सयाजी शिंदे यांनी दिली. प्रकल्पातील मोठी फसवणूक तारळी प्रकल्पाची मूळ किंमत 5,675 कोटी रुपये असताना, केवळ राज्य वन्यजीव संवर्धन निधी वाचवण्याच्या हेतूने ती अवघी 56.75 कोटी रुपये दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अदानी कंपनीने मोठी फसवणूक केली असून, वनविभाग, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप अभिनेते सयाजी शिंदे आणि विवेकानंद पाटील यांनी केला आहे. या प्रकल्पावर चौफेर टीकेची झोड उठली असून, पर्यावरणासाठी हा प्रकल्प हटवण्याकरिता जोरदार लढा उभारण्याचा निर्धार या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास आणि लढ्याचा इशारा ‘नॅशनल वाइल्ड लाईफ बोर्डा’ची कोणतीही परवानगी नसताना या प्रकल्पाचे 80 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे येथील झाडे, पर्यावरण आणि पशुपक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा अतोनात ऱ्हास झाला असून, या प्रकल्पामुळे भविष्यात सह्याद्रीत वाघच शिल्लक राहणार नाहीत, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी सरकारने बेळगावच्या मराठी माणसांकडे जसे दुर्लक्ष केले, तसेच आता महाराष्ट्रातील गावांकडे केले जात आहे. आपण बांगड्या भरलेल्या नाहीत, महाराष्ट्राचा स्वाभिमान अजून जागा आहे. त्यामुळे आता गप्प न बसता सह्याद्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र सरकारने सह्याद्रीच्या खोऱ्यात आणखी 23 ते 24 प्रकल्प प्रस्तावित आहेत. ते पूर्णपणे हटवल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही. जर सरकारने हे प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न केला तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. गुजरातचे भांडवलदार स्वतःच्या विकासासाठी सह्याद्रीमध्ये येत आहेत. स्थानिकांनी आता शहाणे झाले पाहिजे, असे आवाहन सयाजी शिंदे आणि विवेकानंद पाटील यांनी केले आहे.
Source link
अदानींच्या 'तारळी पंप स्टोरेज' प्रकल्पात हजारो कोटींची फसवणूक:सयाजी शिंदे आणि विवेकानंद पाटील आक्रमक, सरकारला दिला थेट इशारा