![]()
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून गुजरातच्या तुरुंगातून माफिया राज चालवले जात असल्याचा अत्यंत गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात असतानाही बॉलिवूड कलाकारांना माफियांच्या खुल्या धमक्या येत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात काय फुगड्या घालत आहेत का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सोमवारी मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी बॉलिवूडमधील दहशतीचे वातावरण, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक, राहुल गांधींचा दौरा आणि वैजापूरमधील रोहित पठारे हत्याकांडावरून केंद्र व राज्य सरकारवर चौफेर टीका केली. अमिताभ बच्चन बुलेटप्रुफ काचेमागून चाहत्यांना भेटतात, ही शरमेची बाब राज्यातील गुंडगिरी आणि बॉलिवूडमधील भीतीच्या वातावरणावर भाष्य करताना सपकाळ यांनी केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले. बॉलिवूडमधील अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकांना खुलेआम धमक्या दिल्या जात आहेत. अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाल्यानंतर आता महानायक अमिताभ बच्चन यांना लक्ष्य केले जात आहे. हल्ल्याच्या भीतीमुळे अमिताभ बच्चन यांना बुलेटप्रुफ काचेमागून आपल्या चाहत्यांना भेटावे लागत आहे, ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. नोटबंदीचा दावा फोल नोटबंदीमुळे देशातील दहशतवाद आणि गुंडगिरी संपुष्टात येईल, असा दावा सरकारने केला होता. मात्र, आज दहशतवाद आणि माफिया राज अधिक जोमाने फोफावले आहे. काँग्रेसची सत्ता असताना कलाकार निर्भयपणे फिरत होते; आजची परिस्थिती पाहून जनता ‘कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन’ असे म्हणत असल्याचा टोला त्यांनी लगावला. गुजरातच्या तुरुंगातून ही टोळी चालवली जात असून केंद्रीय गृहमंत्र्यांचा याला वरदहस्त असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. मतदारसंघ पुनर्रचनेला इंडिया आघाडीचा विरोध कायम संसदेत येऊ घातलेल्या मतदारसंघ पुनर्रचना (डीलिमिटेशन) विधेयकावरून सपकाळ यांनी सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली. या विधेयकामुळे लोकसभेतील खासदारांची संख्या 550 वरून थेट 850 पर्यंत वाढणार आहे. जर लोकप्रतिनिधींचीच संख्या वाढवायची असेल, तर केवळ खासदारांची संख्या का वाढवता? स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांची संख्याही वाढवली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी या विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असली, तरी काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा या विधेयकाला पहिल्या दिवसापासूनच विरोध आहे आणि तो कायम राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) या संदर्भात आवश्यक ती पावले उचलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारताची बदनामी राहुल गांधींमुळे नाही, तर एपस्टिन फाईल आणि पेगॅससमुळे राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात, या अमित शहा यांच्या टीकेला सपकाळ यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “भारताची जगात बदनामी राहुल गांधींमुळे होत नाही, तर मोदी सरकारच्या मंत्र्याचे नाव एपस्टिन फाईलमध्ये आल्यामुळे होत आहे. विरोधी पक्षांचे नेते आणि न्यायाधीशांचे फोन पेगॅसस स्पायवेअरद्वारे टॅप केल्यामुळे, संसदेत विरोधी पक्षनेत्यांचा माईक बंद केल्यामुळे, तसेच देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि भूक निर्देशांकामुळे भारताची प्रतिमा मलीन होत आहे.” राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी 4500 किलोमीटरची पदयात्रा काढून कष्टकरी, शेतकरी, हमाल आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. आता अमित शहा यांनीही आपली सुरक्षा बाजूला सारून सामान्य जनतेत मिसळावे, असा सल्ला त्यांनी दिला. वैजापूरमधील रोहित पठारे हत्याकांडाचा तपास संशयास्पद; उद्या कुटुंबियांची भेट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील तरुण रोहित पठारे याच्या हत्येप्रकरणी सपकाळ यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची ओळख परेड अद्याप कुटुंबियांसमोर करण्यात आलेली नाही, उलट पठारे कुटुंबियांनाच धमक्या दिल्या जात आहेत. राज्यात अशा प्रकारच्या निर्घृण हत्या होत असताना देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे ते म्हणाले. हर्षवर्धन सपकाळ उद्या वैजापूर येथे जाऊन रोहित पठारे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. महाराष्ट्र एनएसयूआयच्या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ या पत्रकार परिषदेदरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते महाराष्ट्र नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या (एनएसयूआय) ‘शिक्षण वाचवू, पर्यावरण वाचवू, लोकशाही वाचवू’ या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. वृक्षसंवर्धन, पर्यावरण रक्षण आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात संघटना राज्यभर आंदोलन छेडणार असून, आगामी विधिमंडळ अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. याप्रसंगी विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार वजाहत मिर्झा, राहुल बोंद्रे आणि एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे आदी नेते उपस्थित होते. ————————————————– हेही वाचा… वडेट्टीवारांना खासगीत विचारलं तर तेही म्हणतील मतदारसंघ पुनर्रचना झालीच पाहिजे: चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला; आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठ्या निर्णयाची घोषणा मतदारसंघ पुनर्रचनेच्या (डीलिमिटेशन) मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय वादात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. “विजय वडेट्टीवार किंवा नाना पटोले यांना खासगीत विचारले, तर तेही सांगतील की विकासासाठी मतदारसंघांची पुनर्रचना झालीच पाहिजे. मात्र, त्यांचे नेते राहुल गांधी फटकारतील या भीतीने ते उघडपणे बोलत नाहीत,” असा सणसणीत टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. सोमवारी (16 नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मतदारसंघ पुनर्रचना, आदिवासी शेतकऱ्यांना मालकी हक्काचा ‘सात-बारा ही’ देण्याची मोहीम, 15 लाख शेतकऱ्यांना फार्मर आयडी, दुष्काळ निवारण आणि हिवाळी अधिवेशनातील काटकसर यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर भाष्य केले. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
सेलिब्रिटींना माफियांच्या खुल्या धमक्या:हर्षवर्धन सपकाळ यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल- केंद्राचे आणि राज्याचे गृहमंत्री पुण्यात फुगड्या घालत आहेत का?