![]()
पुण्यात 20 ते 22 नोव्हेंबरदरम्यान श्रीराम लागू रंग-अवकाश येथे पपेट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र (गुरुकुल) यांनी हा महोत्सव आयोजित केला आहे. महोत्सवात पारंपरिक आणि समकालीन कठपुतळी प्रयोग, कार्यशाळा आणि संवाद सत्रे होतील. या माध्यमातून कठपुतळी कलेचे विविध पैलू सादर केले जातील. महोत्सवाची संकल्पना कठपुतळी कलाकार, दिग्दर्शक आणि संकल्पनाकार अनुरूपा रॉय यांची आहे. देशाच्या विविध भागांतील कलाकार आणि कलापथके यात सहभागी होतील. २० नोव्हेंबरला कर्नाटकातील ज्येष्ठ कठपुतळी कलाकार एस. गुंडुराजू आणि त्यांचे कुटुंबीय ‘सिल्लेक्याथा रामायण’ हा प्रयोग सादर करतील. हसन जिल्ह्यातील नवव्या पिढीचे कलाकार गुंडुराजू तोगालू गोम्बेयाटा या पारंपरिक छायाकठपुतळी कलेतून रामायण सादर करतात. सिल्लेक्याथा समुदायाने चर्मकठपुतळीची ही परंपरा जपली आहे. २१ नोव्हेंबरला ‘पपेटशाला’तर्फे ‘अॅम आय लॉस्ट?’ हा प्रयोग होईल. सफर नावाचा मुलगा दिल्लीला जाण्यासाठी गाव सोडतो. त्यानंतर त्याला शोषण आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कठपुतळ्या आणि रोजच्या वापरातील वस्तूंच्या मदतीने सादर होणारा हा प्रयोग बालपण, संघर्ष, जगण्याची धडपड, आशा आणि कथाकथनाच्या शक्तीवर भाष्य करतो. २२ नोव्हेंबरला ‘कटकथा पपेट्री आर्ट्स ट्रस्ट’तर्फे ‘साऊ’ हा प्रयोग सादर होईल. अविनाश कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या प्रयोगाला अनुरूपा रॉय यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्वाती राजे यांच्या ‘अंधाराचा गाव’ या मराठी बालपुस्तकातून आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील घटनांमधून याची प्रेरणा घेतली आहे. बुनराकू शैलीतील कठपुतळ्या, स्वतःच्या प्रकाशव्यवस्थेने उजळणाऱ्या कठपुतळ्या आणि अभिनव प्रकाशयोजनेचा वापर या संवादविरहित प्रयोगात केला आहे. सामाजिक रूढींना आव्हान देत गावात आशेचा प्रकाश निर्माण करणाऱ्या एका लहान मुलीची कथा यातून सांगितली आहे. महोत्सवाच्या तिन्ही दिवसांच्या सकाळच्या सत्रांत अनुरूपा रॉय यांची कार्यशाळा होईल. जपानच्या बुनराकू रंगभूमीच्या परंपरेवर आधारित कठपुतळ्यांना हालचालींद्वारे जिवंत करण्याची तंत्रे यात शिकवली जातील.
Source link
पुण्यात 20 ते 22 नोव्हेंबरदरम्यान कठपुतळी महोत्सव:महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातर्फे आयोजन