![]()
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने शिरूर आणि लोणावळ्यातील दोन स्वतंत्र प्रकरणांत एका पोलिस हवालदाराला अटक केली, तर एका पोलिस उपनिरीक्षकाला ताब्यात घेतले. शिरूर प्रकरणात 95 हजार रुपये आणि लोणावळा प्रकरणात 20 हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. शिरूर पोलिस ठाण्यातील हवालदार सतीश नाथाराव मुंढे (वय 45) याला अटक करण्यात आली. तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी त्याने एक लाख रुपये मागितल्याची तक्रार विभागाला मिळाली होती. विभागाच्या माहितीनुसार, लाच मागितल्याची पडताळणी करण्यात आली. टाकळी हाजी पोलिस चौकीत मुंढे याने सुरुवातीला एक लाख रुपये मागितले. तडजोडीनंतर 95 हजार रुपये मागितल्याचे पडताळणीत समोर आले. त्यानंतरच्या सापळ्यात मुंढे याने पंचांसमक्ष 95 हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. पथक आल्याचे समजताच तो रक्कम आणि तक्रारदाराविरुद्धच्या गुन्ह्याची कागदपत्रे घेऊन पळून गेल्याचे विभागाने सांगितले. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 7 आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 238 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मुंढे याला शिरूर नगरपरिषद परिसरातून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्याला 20 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक नाथा रामकिशन केकाण (वय 38) याला 20 हजार रुपये स्वीकारल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले. तक्रारदाराच्या भावाविरुद्ध दाखल गुन्ह्यातील कलमे कमी करण्यासाठी आणि जामिनासाठी मदत करण्याकरिता केकाण याने यापूर्वी वेळोवेळी एक लाख 30 हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप तक्रारीत आहे. पुढील तपासात मदत करण्यासाठी आणि आरोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी त्याने आणखी 30 हजार रुपये मागितल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पडताळणीत 20 हजार रुपये मागितल्याचे समोर आले. लोणावळ्यात मॅप्रो गार्डनजवळील फूड कोर्ट येथे सापळा रचण्यात आला. तेथे रक्कम स्वीकारताना केकाण याला ताब्यात घेतल्याचे विभागाने सांगितले. त्याच्याविरुद्ध लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Source link
शिरूरमध्ये हवालदाराने 95 हजारांची लाच घेतल्याचा आरोप:लोणावळ्यात उपनिरीक्षकाने 20 हजार स्वीकारल्याचा आरोप; दोन्ही प्रकरणांत पोलिसांवर कारवाई