वैयक्तिक आयुष्यातील संकटे, प्रतिकूल परिस्थिती आणि अनेक आव्हानांवर मात करून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या सहा महिलांनी आपल्या संघर्षाची आणि जिद्दीची कहाणी मांडली. दक्षिण मुख्यालयाच्या आर्मी वुमेन्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे (एडब्ल्यूडब्ल्यूए) आयोज
.
या कार्यक्रमात वैशाली अमोल गोरे, मेजर एरिका सुसान डॅनियल, मनीषा कुमारी, संध्या राणी, लेफ्टनंट कर्नल स्पंदना रेड्डी आणि चित्रलेखा नवले यांनी आपापल्या आयुष्यातील संघर्षाचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. वैयक्तिक नुकसानानंतर नव्याने आयुष्य उभे करणे, कठीण परिस्थितीतही स्वप्नांचा पाठपुरावा करणे आणि सामाजिक योगदानातून स्वतःची ओळख निर्माण करणे, अशा विविध पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला एडब्ल्यूडब्ल्यूएच्या माजी अध्यक्षा वीणा नरवणे, कला सल्लागार, सांस्कृतिक राजदूत व शास्त्रीय नृत्यांगना डॉ. उषा राधाकृष्णन आणि साईशा इंडिया फाउंडेशनच्या संस्थापक जयश्री रतन उपस्थित होत्या.
दक्षिण मुख्यालयाच्या एडब्ल्यूडब्ल्यूएच्या क्षेत्रीय अध्यक्षा अनुपमा पुष्कर यांनी महिलांना त्यांचे अनुभव मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांमधील सुप्त क्षमता ओळखणे, परस्परांना आधार देणे आणि आत्मविश्वास वाढविणे यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि सर्वसमावेशक राष्ट्रउभारणीच्या राष्ट्रीय संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम ठरला. लष्करी सेवेशी संबंधित महिलांना वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. तरीही कुटुंब आणि समाजाला बळ देत त्या देशसेवेच्या मूल्यांचे जतन करतात. संकटांपुढे न झुकता सन्मानाने उभे राहण्याची जिद्द हाच खऱ्या अर्थाने अदम्य स्त्रीशक्तीचा परिचय असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

