![]()
नागपूरमध्ये वाहतूक निर्बंधांविरोधात ई-रिक्षाचालक १९ नोव्हेंबरला गृहमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार आहेत. एक हजाराहून अधिक ई-रिक्षा सहभागी होतील, असा आयोजकांचा दावा आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नागपूर शहर अध्यक्ष नरेश निमजे यांच्या नेतृत्वात दुपारी १२ वाजता व्हेरायटी चौकातून मोर्चा सुरू होईल. तो धरमपेठ येथील गृहमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत जाईल. तिथे मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. शहरातील विविध रस्त्यांवर ई-रिक्षांच्या वाहतुकीवर निर्बंध असल्याने व्यवसायाच्या संधी कमी झाल्या आहेत, असे चालकांचे म्हणणे आहे. प्रवासी मिळवण्यासाठी मर्यादित रस्त्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने उत्पन्न घटत असल्याचा त्यांचा आरोप आहे. वाहतूक नियम मोडल्याबद्दल दंड आणि रिक्षा जप्त करण्याच्या कारवाईमुळे आर्थिक अडचणी वाढत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. वाहतूक नियमांचा पुन्हा विचार करून चालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. शहरातील सर्व रस्ते ई-रिक्षांसाठी खुले करावेत, नियम मोडल्याबद्दलचा दंड १०० ते ५०० रुपयांपर्यंत ठेवावा आणि कोणत्याही परिस्थितीत ई-रिक्षा जप्त करू नयेत, या तीन मागण्यांसाठी मोर्चा काढला जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ई-रिक्षांना प्रोत्साहन दिले, तरी चालकांच्या प्रश्नांवर भूमिका घेत नसल्याची नाराजी आंदोलकांनी व्यक्त केली. मुकेश मासुरकर, नरेश निमजे, प्रशांत नखाते, गिरीश तितरमारे, ज्योती खांडेकर, वीणाताई भोयर आणि रवींद्र भामोडे यांच्यासह संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी चालकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Source link
ई-रिक्षाचालक वाहतूक निर्बंधांविरोधात मोर्चा काढणार:आज गृहमंत्र्यांच्या निवासस्थानावर जाणार; एक हजाराहून अधिक रिक्षा सहभागी होण्याचा आयोजकांचा दावा