Headlines

गोकुळच्या दूध दरात मोठी वाढ:म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर 6 रुपये, तर गाईच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ, दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही वाढीव दराचा लाभ




कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या दूध दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोकुळच्या नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर 6 रुपयांची, तर गाईच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार असून म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर 3 रुपये, तर गाईच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गोकुळच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ असल्याचे सांगितले जात आहे. शनिवारपासून नवीन दर लागू होणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध दूध संघांकडून दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ केली जात आहे. पशुखाद्य, चारा, वाहतूक आणि जनावरांच्या देखभालीचा खर्च वाढल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. दुसरीकडे, दूध उत्पादनासाठी लागणारा खर्च वाढत असताना शेतकऱ्यांना मिळणारा दर पुरेसा नसल्याची भूमिका दूध उत्पादकांकडून मांडली जात होती. त्यामुळे गोकुळच्या दूध दरातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर नव्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना प्रतिलिटर 3 रुपयांचा दिलासा गोकुळने घेतलेल्या निर्णयानुसार म्हशीच्या दूध विक्री दरात 6 रुपयांची वाढ केली असली, तरी दूध उत्पादकांना प्रतिलिटर 3 रुपये अधिक मिळणार आहेत. म्हणजेच म्हशीचे दूध संघाला पुरवणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. गाईच्या दूध खरेदी दरातही प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गाईचे दूध उत्पादक आणि म्हशीचे दूध उत्पादक अशा दोन्ही घटकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव दर मिळावा, अशी मागणी समविचारी आघाडीकडून सातत्याने करण्यात येत होती. दुष्काळी परिस्थिती, वाढता उत्पादन खर्च आणि जनावरांच्या संगोपनासाठी लागणारा खर्च लक्षात घेता खरेदी दरात वाढ करणे आवश्यक असल्याचे आघाडीचे म्हणणे होते. दूध विक्री दर वाढवण्यास विरोध नसला, तरी ग्राहकांवरील आर्थिक भार वाढवण्यापूर्वी दूध उत्पादकांना मिळणाऱ्या दरात वाढ करावी, अशी भूमिका समविचारी आघाडीने मांडली होती. 70 कोटींची तूट भरून काढण्यासाठी दरवाढीचा निर्णय गोकुळ दूध संघासमोर आर्थिक तूट भरून काढण्याचे आव्हानही आहे. दूध संघाला सुमारे 70 कोटी रुपयांची तूट असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त चेअरमन आणि संचालक मंडळाने दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. विक्री दरात वाढ केल्यामुळे संघाच्या आर्थिक गणिताला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या घरगुती खर्चावर होणार आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात दूध उपलब्धतेचा आढावा घेतल्यानंतर पुन्हा दरवाढीबाबत विचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात दूध दरात आणखी बदल होणार का, याकडे दूध उत्पादकांसह ग्राहकांचे लक्ष लागले आहे. गोकुळच्या चेअरमन निवडीवरून राजकीय संघर्ष गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर चेअरमनपदाच्या निवडीवरून कोल्हापूरच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली होती. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनेलने निवडणुकीत 13 जागा जिंकून बहुमत मिळवले होते. तर महायुतीच्या पॅनेलला 12 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे चेअरमनपदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, संचालक मंडळाच्या बैठकीसाठी आवश्यक असलेल्या 14 सदस्यांच्या संख्येचा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत गोकुळ दूध संघावर चार शासननियुक्त सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. या सदस्यांना मतदानाचा अधिकारही देण्यात आला. त्यामुळे महायुतीला चेअरमन निवडीसाठी आवश्यक संख्याबळ मिळाले. महायुतीच्या नेतृत्वाखाली माजी आमदार शिवाजी पाटील यांची गोकुळच्या चेअरमनपदी निवड झाली. या निवडीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले होते. अखेर शिवाजी पाटील यांनी चेअरमनपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गोकुळच्या नव्या नेतृत्वाच्या पहिल्याच निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. हेही वाचा…. पंढरपुरात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड:बॅटरी लो झाल्याने इंजिन सुरू होईना, अखेर कारने पुण्याकडे रवाना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपुरात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. कार्तिकी वारीच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे गुरुवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. दौऱ्यातील कार्यक्रम आणि पाहणी पूर्ण करून ते मुंबईला परतण्यासाठी हेलिपॅडवर पोहोचले. मात्र, हेलिकॉप्टर सुरू करण्याचा प्रयत्न केला असता त्यामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. हेलिकॉप्टरची बॅटरी लो झाल्यामुळे त्याचे दुसरे इंजिन सुरू होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऐनवेळी त्यांचा हेलिकॉप्टरने मुंबईला जाण्याचा नियोजित प्रवास रद्द करावा लागला. अखेर एकनाथ शिंदे यांनी कारने पुण्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. पुणे विमानतळावरून विमानाने ते मुंबईला रवाना होणार आहेत. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *