मुंबई6 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

देशातील शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या सहा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्सनी (REITs) आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या तिमाहीत एकत्रितपणे 5.25 लाखांहून अधिक युनिटधारकांना 3,234 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीचे वितरण केले आहे. इंडियन आरईआयटी असोसिएशनच्या (IRA) वतीने ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.
ब्रुकफील्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्ट, एम्बसी ऑफिस पार्क्स आरईआयटी, माईंडस्पेस बिझनेस पार्क्स आरईआयटी, नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट, नॉलेज रिॲल्टी ट्रस्ट आणि बागमने प्राईम ऑफिस आरईआयटी या सहा संस्थांचा यामध्ये समावेश आहे.
दुसऱ्या तिमाहीअखेर भारतीय आरईआयटी क्षेत्राची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) 3.30 लाख कोटी रुपयांहून अधिक झाली असून, 17 नोव्हेंबर 2026 पर्यंत या क्षेत्राचे एकत्रित बाजार भांडवल 2.09 लाख कोटी रुपयांच्या पार गेले आहे.
या सहा संस्थांकडे देशभरात 215 दशलक्ष चौरस फुटांपेक्षा जास्त ग्रेड-ए ऑफिस आणि रिटेल जागांचे व्यवस्थापन आहे. स्थापनेपासून आतापर्यंत या ट्रस्ट्सनी गुंतवणूकदारांना एकत्रितपणे 38,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे वितरण केले असून, देशाच्या भांडवली बाजारात त्यांचे वाढते महत्त्व यातून अधोरेखित होते.
या कामगिरीबाबत बोलताना नॉलेज रिॲल्टी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इंडियन आरईआयटी असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष गोडबोले म्हणाले की, या तिमाहीत झालेले 3,234 कोटी रुपयांचे वितरण हे भारतीय आरईआयटी क्षेत्राची आणि त्यातील मालमत्तांची भक्कम स्थिती दर्शवते. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCCs) आणि फ्रंट-ऑफिस कंपन्यांकडून कार्यालयांसाठी वाढती मागणी असल्याने या क्षेत्रासाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
गुंतवणूकदारांची संख्या आता 5 लाखांच्या पुढे गेली असून ती दर तिमाहीला वाढत आहे. जागेचा उत्तम वापर, नियमित भाडे वसुली आणि दर्जेदार मालमत्ता यांमुळे गुंतवणूकदारांना सातत्याने परतावा मिळत असून, धोरणात्मक पाठबळामुळे भविष्यात भांडवली बाजारात हे क्षेत्र आणखी मोठी भूमिका बजावेल.
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI) मार्गदर्शनाखाली 2023 मध्ये इंडियन आरईआयटी असोसिएशनची स्थापना करण्यात आली. देशात आरईआयटी क्षेत्राचा विकास, जनजागृती आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी ही ना-नफा तत्त्वावरील संस्था कार्यरत आहे. व्यवसाय आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासोबतच जागतिक दर्जाचे सर्वोत्तम निकष या क्षेत्रात रुजवण्यासाठी ही संघटना सेबीसोबत समन्वयाने काम करत आहे.