Headlines

चाकण-तळेगावमध्ये ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे हटवणार:पावसाळ्यापूर्वी पाण्याचे मार्ग मोकळे करणार; रस्त्यांच्या निविदा नोव्हेंबरमध्ये, अवजड वाहनांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश




चाकण-तळेगाव औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे आणि प्लास्टिक कचऱ्याच्या समस्यांवर उपाययोजना करण्यात येणार आहेत. पावसाळ्यापूर्वी पाण्याचे मार्ग मोकळे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई होईल. नियम वारंवार मोडणाऱ्या कंपन्यांनाही जबाबदार धरले जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयात डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. त्यात चाकण-तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा आणि विकासकामांचा आढावा घेण्यात आला. आमदार बाबाजी काळे बैठकीला उपस्थित होते. ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी संबंधितांना दिलेल्या नोटिसांची मुदत संपली आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे हटवण्याची मोहीम राबवण्याचे निर्देश डुडी यांनी दिले. पीएमआरडीएकडून यासाठी यंत्रसामग्री घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. ओढे-नाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांची रुंदी निश्चित करावी आणि पाण्याचे नैसर्गिक प्रवाह मोकळे करावेत. पुढील पावसाळ्यात औद्योगिक परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्यास त्यांनी सांगितले. रस्त्यांच्या कामांची अंदाजपत्रके अंतिम करून तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता तातडीने घ्यावी. नोव्हेंबरमध्ये निविदा प्रक्रिया सुरू करून डिसेंबरअखेर कामे सुरू करावीत. रस्त्यांसोबत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेजची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले. चाकणमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपलब्ध पार्किंग, क्रेन आणि मनुष्यबळाचा वापर करावा. नियम मोडणारी वाहने दीर्घकाळ ताब्यात ठेवून न्यायालयीन कारवाई करावी. वारंवार नियम मोडणाऱ्या कंपन्यांची स्वतंत्र माहिती गोळा करून त्यांनाही जबाबदार धरावे, असे सांगण्यात आले. औद्योगिक कंपन्यांच्या सहभागातून रस्त्यांचे सुशोभीकरण, हरितीकरण आणि दुभाजकांची देखभाल केली जाणार आहे. कामगारांच्या प्रवासाचे सर्वेक्षण करून पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी ४५ आणि ६० मीटर रुंदीच्या रस्त्यांवरील उपलब्ध जागा तसेच सेवा रस्त्यांचा वापर करण्याचाही विचार आहे. प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी दीर्घकालीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वतंत्र यंत्रणा नेमावी. रस्त्यांच्या कडेला साचणारा कचरा उचलण्याची तातडीची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सर्व विभागांनी ठरलेल्या वेळेत समन्वयाने कामे पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *