Headlines

भाजप आमदार महेश बालदी यांना 3 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा:16 वर्षांपूर्वीच्या मारहाण प्रकरणात अलिबाग न्यायालयाचा निकाल




उरण विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश बालदी यांना 2010 मधील मारहाणीच्या एका प्रकरणात अलिबाग न्यायालयाने 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. महेश बालदी यांच्यासह अन्य 3 जणांनाही न्यायालयाने दोषी ठरवले असून, चौघांनाही ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तब्बल 16 वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल लागल्याने रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर चारही आरोपींना जामीन मंजूर केला आहे. तसेच निकालाविरोधात जिल्हा न्यायालयात अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. नेमकं काय घडलं होतं? मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 2010 मध्ये रायगड जिल्ह्यातील उरण येथे घडली होती. परिसरातील एका मुलीची छेडछाड केल्याचा आरोप एका तरुणावर होता. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला जाब विचारण्यासाठी महेश बालदी आणि त्यांच्यासोबत काही जण गेले होते. यावेळी संबंधित तरुणासोबत वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. संबंधित तरुणाला मारहाण करण्यात आली तसेच त्याला शिवीगाळही करण्यात आल्याचा आरोप होता. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या घटनेशी संबंधित खटला अलिबाग येथील न्यायालयात सुरू झाला. घटनेनंतर अनेक वर्षे न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. अखेर तब्बल 16 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. आमदार महेश बालदींसह चौघे दोषी अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने या प्रकरणातील पुरावे आणि सुनावणीच्या आधारे आमदार महेश बालदी यांच्यासह चार जणांना दोषी ठरवले. त्यानंतर न्यायालयाने चौघांनाही प्रत्येकी 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे विद्यमान भाजप आमदाराला न्यायालयाने शिक्षा सुनावल्याची घटना राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. जामीन मंजूर; अपीलासाठी एक महिन्याची मुदत दरम्यान, न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतरही चारही आरोपींना जामीन मंजूर केला आहे. तसेच या निकालाला जिल्हा न्यायालयात आव्हान देण्यासाठी आरोपींना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील न्यायालयीन प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. 2010 मध्ये घडलेल्या या घटनेचा निकाल 16 वर्षांनंतर लागला असला, तरी आरोपींकडून अपील केले जाणार का आणि त्यानंतर न्यायालयात काय घडामोडी होतात, याकडे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. गोकुळच्या दूध दरात मोठी वाढ:म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर 6 रुपये, तर गाईच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ, दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही वाढीव दराचा लाभ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या दूध दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोकुळच्या नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर 6 रुपयांची, तर गाईच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार असून म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर 3 रुपये, तर गाईच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गोकुळच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ असल्याचे सांगितले जात आहे. शनिवारपासून नवीन दर लागू होणार असल्याची माहिती आहे. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *