![]()
मनपाच्या ११ संवर्गातील २२२ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेचा ११ पैकी ८ पदांचा निकाल जाहीर झाला. ३ पदांचा निकाल जाहीर होणे बाकी आहे. या भरतीत २०० पैकी १८० गुण असलेल्या २ उमेदवारांवर संशय आल्याने मनपाने त्यांची चौकशी केली. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नाही. व परीक्षेची प्रक्रियाही रद्द केली नाही. मात्र त्याऐवजी उमेदवारांची परस्पर परीक्षा घेतली.यामध्ये ९० पेक्षा कमी गुण मिळाल्याने संशय बळावला. उमेदवारांना दिलेल्या रफशीट तपासल्या असता त्या कोऱ्या होत्या. तर, अवघ्या १० मिनिटांत त्यांनी पूर्ण पेपर सोडवल्याचेही समोर आले. यामुळे चौकशीअंती त्यांना बाद ठरवत निकाल जाहीर केला. २ टॉपरांचीच चौकशी केली असली तरी आणखी काही परीक्षार्थीदेखील यांमध्ये दोषी असण्याची शक्यता आहे. यामुळे मनपाची भरती प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मनपाच्या ११ संवर्गांतील २२२ रिक्त पदांसाठी १७ फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान ऑनलाइन अर्ज मागवले होते. त्यानंतर आयबीपीएसमार्फत ८ आणि ९ जुलै रोजी ३० केंद्रांवर २९ हजार परीक्षार्थीनी ऑनलाइन परीक्षा दिली. अग्निशमन दलातील पदांसाठी लेखी परीक्षेसोबतच मैदानी व शारीरिक चाचणीही घेण्यात येणार आहे. एका पदासाठी ३ पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. परीक्षेतील गैरप्रकारांमध्ये सहभागी असल्याचे आढळलेल्या ४० ते ५० उमेदवारांचे निकाल रद्द केले. अन्य पेपरफुटीनंतर मनपाच्या भरतीत कॉपी झाल्याची शक्यता वर्तवली जाते. १० मिनिटांत सोडवला पेपर, २०० पैकी १८० गुणांमुळे संशय मनपाच्या नोकरभरतीप्रकरणी अनुत्तरित प्रश्न १. फक्त दोघांचीच फेरपरीक्षा का? टॉप-२ उमेदवारांनी हायटेक कॉपी केली असेल, तर मेरिट यादीतील इतर उच्च गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची चौकशी का झाली नाही? २. गुन्हा दाखल का केला नाही? जर गैरप्रकार सिद्ध झाला आहे आणि ४०-५० जणांचे निकाल रद्द झाले आहेत, तर या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी मनपाने पोलिसांत फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही? ३.आयबीपीएसच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह आयबीपीएससारख्या नामांकित संस्थेच्या ३० केंद्रांवर परीक्षा होऊनही इतक्या मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार कसे घडले? दोन टॉपर संशयास्पद परीक्षार्थींची उलटतपासणी सीसीटीव्हीमध्ये ४० ते ५० परीक्षार्थींच्या संशयास्पद हालचाली आढळल्याची माहिती आम्हाला आयबीपीएसने दिली होती. त्याची पडताळणी करून त्यांचा निकाल रद्द करून यादी जाहीर केली. २ टॉपर संशयास्पद उमेदवारांची उलटतपासणी केली असता संशयास्पद आढळल्याने त्यांना बाद केले. -अमोल येडगे, आयुक्त, मनपा. एक्स्पर्ट व्ह्यू: पुन्हा परीक्षा घेण्याचा मनपाला अधिकार नाही जास्त गुण मिळाले म्हणून विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा अधिकार मनपाला नाही. संशय असल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करणे अपेक्षित आहे. दोषी आढळल्यास पूर्ण परीक्षा प्रक्रियाच रद्द करावी लागते. विशेष म्हणजे टॉपर दोघांनी परीक्षेत गैरप्रकार केला म्हणून त्यांना बाद केले असल्यास त्यापुढील इतर उमेदवारांनीही गैरप्रकार केलेला असण्याची शक्यता आहे. बाद ठरवलेले टॉपचे ते दोन विद्यार्थी न्यायालयात दाद मागू शकतात. आकाश जाधव, स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ.
Source link
घोळ: नोकरभरतीच्या परीक्षेतील 2 टॉपर्सनामनपाने परस्पर परीक्षा घेऊन बाद केले:मनपाची 222 पदांची नोकरभरती संशयाच्या भोवऱ्यात; 29 हजार जणांनी दिली होती परीक्षा