![]()
वैजापूर-शिऊर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ वरील शिऊरनजीक असलेल्या दादा मुनी आश्रमासमोर गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकींवरील चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. खंडाळा येथील दिलीप जाधव आणि राजेंद्र दिगंबर पवार हे दोघे दुचाकीवरून ( एमएच २० डीएल ७०४९) शिऊरकडे जात होते. याच दरम्यान, देवगाव येथून खंडाळा येथील महाविद्यालयात परीक्षेसाठी कार्तिक नरोडे व त्याचा मित्र दुचाकीवरून (एमएच २० एचई ४२५७) येत होते. दादा मुनी आश्रमासमोर दोन्ही दुचाकी भरधाव वेगात असल्याने त्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चौघेही रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. शेतात काम करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना वैजापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर, प्रकृती गंभीर असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी कार्तिक नरोडे व त्याच्या मित्राला पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर, जखमी दिलीप जाधव यांच्यावर वैजापूर येथे व राजेंद्र पवार यांच्यावर शिर्डी येथे उपचार सुरू आहेत. शिऊर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Source link
शिऊरनजीक दुचाकींची धडक:चौघे गंभीर जखमी