![]()
वैजापुरातील रोहित पठारे हत्याकांडाच्या तपासाला आता निर्णायक वळण मिळाले आहे. हत्याकांडासह त्यापूर्वी दोन गटांत झालेल्या रक्तरंजित संघर्षाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेण्यात आला आहे. रोहितच्या हत्येचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी), तर परस्परविरोधी खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपविण्यात आला आहे. एकाच घटनाक्रमाशी संबंधित गुन्ह्यांच्या तपासासाठी दोन स्वतंत्र यंत्रणा नियुक्त झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच हत्याकांडाचा तपास एसआयटीमार्फत सुरू असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी तथा तत्कालीन तपास अधिकारी भागवत फुंदे यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आता हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी दिली. तर पूर्वीच्या हाणामारीशी संबंधित गुन्ह्यांच्या तपासाची जबाबदारी बीडच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडे सोपविण्यात आली आहे. हत्याकांडानंतर गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया, तपासाची दिशा आणि तपास अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर आंदोलकांनी गंभीर आक्षेप घेतले होते. याच पार्श्वभूमीवर भीम आर्मीचे प्रमुख तथा खासदार चंद्रशेखर आझाद यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत पोलिस महासंचालक डॉ. सदानंद दाते यांची भेट घेतली होती. यावेळी आंदोलक अशोक कांबळे यांनी घटनाक्रम महासंचालकांसमोर मांडला होता. या भेटीनंतर तपास यंत्रणांमध्ये झालेला बदल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. हत्याकांडातील सर्व २६ आरोपींना ताब्यात घेण्यात स्थानिक पोलिसांना यश आले असले, तरी तपासाच्या कार्यपद्धतीवरील प्रश्न कायम होते. आता दोन्ही यंत्रणांसमोर घटनाक्रमाची सांगड घालण्यासह ठोस पुरावे संकलित करण्याचे आव्हान असणार आहे. मारहाणीचा संपूर्ण घटनाक्रम तपासाच्या रडारवर राहणार हाणामारीची सुरुवात कशी झाली, संघर्षात कोणाचा सहभाग होता, पोलिसांना घटनेची माहिती कधी मिळाली आणि त्यानंतर कोणती कारवाई करण्यात आली, या प्रश्नांची उत्तरे नव्या तपासातून अपेक्षित आहेत. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, तांत्रिक पुरावे आणि पोलिसांच्या तत्कालीन कारवाईची पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे.
Source link
रोहित हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे; स्थानिक पोलिसांकडून दोन्ही तपास काढले:हत्या प्रकरण सीआयडीकडे, तर खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे