![]()
सूर्य, चंद्र आणि इतर सर्व प्रकारच्या प्रकाशापेक्षा परमेश्वराचा प्रकाश अधिक प्रखर आहे. हा प्रकाश कोणत्याही विशिष्ट ठिकाणी नसून प्रत्येकाच्या हृदयात आहे. याची ओळख झाली तर अज्ञानाच्या अंधकारातून मुक्तता होते, असे प्रतिपादन संत श्री गोपाल चैतन्य महाराज यांनी केले. तेलवाडी येथील श्री सद्गुरू धाम आश्रमात अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार आणि सद्गुरू धाम आश्रम तेलवाडी परिवाराच्या वतीने आयोजित आत्मसाक्षात्कार दिवस व एकदिवसीय सत्संग समारोहात ते बोलत होते. अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे संस्थापक संत लक्ष्मण चैतन्य बापूजी यांना १६ नोव्हेंबर १९९५ रोजी आत्मसाक्षात्कार झाला, ज्यामुळे लाखो अनुयायी प्रभावित झाले. या दिनाचे औचित्य साधून दरवर्षी आत्मसाक्षात्कार दिवस साजरा केला जातो. कार्यक्रमास राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, तहसीलदार सारिका भगत, उत्तमराव राठोड, आमदार संजना जाधव, आमदार विलास भुमरे, नगरसेवक अब्दुल जावेद सेठ, माजी खासदार हरिभाऊ राठोड, बाजार समिती सभापती मनोज राठोड, गोकुळ राठोड, उखाभाऊ चव्हाण, कृषीभूषण डॉ. सीताराम जाधव, इंद्रजित नाईक, आकाश बोलधने, नामदेव चव्हाण, नगरसेवक सुरेश डोळस, माजी आमदार किशोर पाटील, नितीन सुरेश पाटील, कैलास अकोलकर आदींची उपस्थिती होती. घूसूर तांडा येथील चैतन्य साधक परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. धर्म, जात, पंथ या गोंधळात सर्वांच्या हृदयात निवास करणाऱ्या चैतन्यरूपी परमेश्वराची ओळख करून घ्यावी असे निरूपण गोपाल महाराज यांनी केले. यावेळी सचिन महाराज यांनी मार्गदर्शन केले. आहार आणि आचरण शुद्ध ठेवावे याप्रसंगी संत गोपाल चैतन्य महाराज यांनी मानवी प्रश्नांवर चिंतन-मंथन केले. आज माणूस अज्ञान आणि अंधारात चाचपडत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी साधना आणि नामस्मरणाच्या माध्यमातून आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करण्याची गरज आहे. त्रिकाळ संध्येचे अनुसरण करावे. जैसा खावे अन्न तैसा होगा मन, जैसा पिये पानी वैसे निकले वाणी या उक्तीनुसार आहार आणि आचरण शुद्ध ठेवावे. सध्या समाजात वाढलेली व्यसनाधीनता आणि व्यसनांना मिळणारी प्रतिष्ठा मानवी जीवनासाठी घातक असल्याचेही ते म्हणाले.
Source link
आत्मसाक्षात्कार दिवस:व्यसनाधीनता, वृक्षतोड मानवी जीवनास घातक ठरणारी : गोपाल चैतन्य महाराज