![]()
शहरातील इसबावी परिसरात झालेल्या राजेंद्र भिंगे यांच्या खून प्रकरणाचा तपास वेगाने पुढे सरकत आहे. या प्रकरणातील तीन संशयितांना गुरुवारी गुजरातमधील अहमदाबाद येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील रोहन नागे हा हडपसर (पुणे) येथील असून, त्यानेच भिंगे यांच्यावर गोळ्या झाडल्याचे तपासात समोर आले आहे. यापूर्वी दोघांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. दि. १७ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास राजेंद्र भिंगे जेवणानंतर घराजवळ शतपावली करीत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून केला होता. नगरसेवक नामदेव भुईटे यांच्या खून प्रकरणात आरोपी म्हणून अनेक वर्षे कारागृहात राहिल्यानंतर भिंगे यांची निर्दोष मुक्तता झाली होती. त्यांच्यावर अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल होते. या घटनेमुळे पंढरपूर शहरात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे हल्लेखोरांचा माग काढण्यात आला. या तपासादरम्यान तात्या ऊर्फ प्रवीण देविदास शिंदे (रा. झेंडे गल्ली) याला बुधवारी (दि. १८) अटक करण्यात आली. त्यानंतर अनिकेत गवळी यालाही गुरुवारी (दि. १९) पंढरपुरातून ताब्यात घेण्यात आले. अशी माहिती तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित वैभव ज्ञानेश्वर फसलकर (रा. व्यासनारायण झोपडपट्टी, पंढरपूर), स्वप्नील अहिरे (रा. पंढरपूर) आणि रोहन नागे (रा. हडपसर, पुणे) हे तिघे खुनानंतर रातोरात गुजरातमध्ये पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांची पथके गुजरातमध्ये रवाना करण्यात आली. अखेर या तिघांचा माग काढत त्यांना अहमदाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. तेथील न्यायालयात हजर करून आवश्यक कायदेशीर परवानगी घेतल्यानंतर त्यांना पंढरपुरात आणण्यात येणार आहे. मयत भिंगे या प्रकरणातील गोळीबार करणारा शूटर रोहन नागे हा हडपसर (पुणे) येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हा खून टोळी युद्धातून झाला की पूर्ववैमनस्यातून, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात आल्याने खुनामागील कारण आणि कटातील इतर सहभागींची माहिती उघड होण्याच्या दृष्टीने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.
Source link
भिंगे खून प्रकरणातील आणखी तीन संशयित आरोपी गुजरातमधून जेरबंद:खुनामागील कारणाचा शोध सुरू; आतापर्यंत पाच जणांना पकडण्यात यश