Headlines

दरासाठी लढाई:24 नोव्हेंबरला सोलापूर-पुणे महामार्ग बेमुदत रोखणार; राजू शेट्टींचा इशारा




ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन आता अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखाने बंद ठेवण्याबाबत दिलेल्या प्रस्तावाची कारखानदारांनी अंमलबजावणी करावी, यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत तोडगा न निघाल्यास २४ नोव्हेंबर रोजी भीमानगर (टेंभुर्णी) येथे सोलापूर-पुणे महामार्ग बेमुदत रोखण्यात येईल, असा इशारा शेट्टी यांनी दिला. गुरुवारी पंढरपुरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या बैठकीत राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. शेट्टी म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला प्रस्ताव कारखानदारांनी स्वीकारला पाहिजे. दोन दिवस कारखाने बंद ठेवून ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा काढावा. शेतकऱ्यांचा ऊस शेतात राहणार नाही, याची जबाबदारी घेतली जाईल. सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या इतर जिल्ह्यांतील कारखान्यांकडूनही ऊस गाळपासाठी नेला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. १९ नोव्हेंबर रोजी होणारी नियोजित बैठक रात्री घेण्यात आली. आम्ही बैठकीला पोहोचू नये, या उद्देशानेच ती रात्री घेण्यात आली असावी, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तरीही संघटनेच्या प्रतिनिधींनी लवचिक भूमिका घेत पहिल्या टप्प्यातील १०० रुपये नंतर घेण्याची तयारी दर्शवली. मात्र, कारखानदार ३ हजार १०० रुपयांच्या पुढे जाण्यास तयार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले. यापूर्वी चंदापुरी आणि राजेवाडी येथील साखर कारखान्यांच्या गव्हाण बंद करण्यात आल्या आहेत. यापुढे प्रत्येक तालुक्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील साखर कारखान्यांच्या गव्हाणीत जाऊन बसावे आणि गाळप बंद पाडावे, असे आवाहनही त्यांनी केले. सोलापूर जिल्ह्यातच कारखानदारच दर कमी का देतात सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून ३ हजार १०० रुपयांपेक्षा अधिक दर देण्यास तयार नाहीत. दुसरीकडे सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील ६६ साखर कारखान्यांनी पहिली उचल ३ हजार ९०० रुपये जाहीर केली आहे. कर्नाटकातही ३ हजार ६०० ते ४ हजार रुपयांपर्यंत पहिली उचल दिली जात आहे. सातारा जिल्ह्यात ३ हजार ९०० रुपये दर जाहीर झाला आहे. मग सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारच शेतकऱ्यांना कमी दर का देत आहेत, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *