![]()
हिंगोली येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालय म्हणजे असून अडचण अन् नसून खेळंबा, असा प्रकार होत असून महाविद्यालयात बर्न वॉर्डच नसल्याने जळीत रुग्णांना उपचारासाठी, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागत आहे. तर हिंगोली शहरात मोठे जळीतकांड झाल्यानंतर वॉर्ड सुरु करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाला जाग येत नसल्याने नागरीकांतून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. हिंगोली येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालय मंजूर झाले मात्र या ठिकाणी पुरेशा सुविधाच मिळत नसल्याचे चित्र आहे. कधी सीटीस्कॅन बंद तर कधी एमआरआय मशीन बंद असे प्रकार नित्याचेच झाले आहेत. या शिवाय तज्ज्ञ डॉक्टरांची वाणवा असल्याने गंभीर आजारी रुग्णांवर तसेच अपघातातील रुग्णांवर महाविद्यालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविले जात आहे. त्यामुळे वैद्यकिय महाविद्यालय सुरु झाल्यानंतर रुग्णांच्या रेफरचे प्रमाण कमी होईल हा दावा फोल ठरू लागल्याचे चित्र आहे. दरम्यान, वैद्यकिय महाविद्यालय सुरु होऊन सुमारे दोन वर्षाचा कालावधी झाला तरी त्या ठिकाणी अद्यापपर्यंत बर्न वॉर्डच उभारण्यात आला नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या जळीत रुग्णांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड, लातुर किंवा छत्रपती संभाजीनगर येथे पाठविले जात आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मानसिकत्रासा सोबतच आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. दरम्यान, मागील महिन्यातच हिंगोली शहरातील कपडागल्ली भागात फटाक्याच्या गोदामाला आग लागून चौघांचा मृत्यू झाला तर सुमारे १० ते १५ जण गंभीररित्या भाजल्या गेले. या जळीतकांडातील गंभीररित्या भाजलेल्या रुग्णांना शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या ठिकाणी बर्न वाॅर्ड नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांच्या रुग्णांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर, लातूर येेथे दाखल केले. हिंगोली शहरात मोठे जळीतकांड झाल्यानंतरही शासकिय वैद्यकिय महाविद्यालय प्रशासनाला बर्न वॉर्ड सुरु करण्यासाठी जाग आलीच नाही. त्यामुळे वॉर्ड सुरु करण्यासाठी आणखी जळीतकांड होण्याची रुग्णालय प्रशासनाकडून वाट पाहिली जात आहे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे नागरीकांतून तिव्र संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. बर्न वॉर्ड नाही; अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांची माहिती हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र, अद्याप महाविद्यालयात स्वतंत्र बर्न वॉर्ड उभारण्यात आलेला नाही, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांनी दिली. त्यामुळे भाजलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र उपचार सुविधेचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Source link
हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बर्न वॉर्डच नाही:जळीतकांडानंतर आरोग्य सुविधांचा प्रश्न ऐरणीवर