Headlines

शिवरायांच्या इतिहासाची विकृत मांडणी झाल्याचे चव्हाण म्हणाले:पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या पुस्तकाचे प्रकाशन




पुण्यात माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व सर्वसमावेशक होते, असे म्हटले. त्यांच्या राजकीय कारभारात आणि सैन्यात विविध जाती-धर्मांतील लोक सहभागी होते. त्यामुळे शिवरायांचे चरित्र विशिष्ट जात-धर्माच्या चौकटीत न पाहता प्रामाणिकपणे समजून घ्यावे, असे ते म्हणाले. गेल्या 100 ते 150 वर्षांत महाराष्ट्रात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर प्रवाहांतून इतिहासाला सोयीचे वळण देण्याचा आणि त्याची विकृत मांडणी करण्याचा प्रयत्न अनेकदा झाला, असेही चव्हाण म्हणाले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या ‘छत्रपती शिवराय आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद व विवेकवादी भूमिका’ या मराठी पुस्तकाचा डॉ. आशुतोष भूपटकर यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे. ‘छत्रपती शिवाजी : ए रॅशनल पर्स्पेक्टिव्ह ऑन हिस्टॉरिक कॉन्ट्रोव्हर्सरिज’ या अनुवादित पुस्तकाचे शुक्रवारी (दि. 20) चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या वेळी ते बोलत होते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्र्वास पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिवप्रेमी मारुतीराव डोंगरे प्रतिष्ठानने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला होता. डॉ. सबनीस यांच्यासह मराठी विश्र्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे, इतिहास अभ्यासक संदीप तापकीर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुतीराव डोंगरे, न्यू इरा पब्लिशिंग हाऊसचे संचालक शरद तांदळे आणि डॉ. आशुतोष भूपटकर मंचावर उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, डॉ. सबनीस यांच्या पुस्तकातून शिवरायांचा इतिहास आणि गेल्या 100 ते 150 वर्षांत निर्माण झालेले जातीय व वैचारिक वाद वस्तुनिष्ठपणे समजून घेता येतील. या विषयावर सखोल आणि धाडसी संवाद सुरू होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विश्र्वास पाटील म्हणाले, इतिहास आज वादग्रस्त विषय झाला आहे. त्यामुळे ऐतिहासिक लेखन न करण्याचे ठरवले आहे. शिवरायांबद्दलचे प्रवाद आणि इतिहासकारांची वेगवेगळी मते तपासण्यासाठी डॉ. सबनीस यांनी लेखणी उचलली. त्यांच्या पुस्तकातून शिवचरित्राचे नवे पैलू आणि सर्वसमावेशक मानवतेचा संदेश मांडला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *