Headlines

महावितरणच्या 'अभय योजनेला' नांदेड परिमंडलात मोठा प्रतिसाद:अवघ्या 15 दिवसांत 1335 ग्राहकांचे अर्ज




वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी लघु व उच्चदाबाच्या कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित बिगरकृषी वीजग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना 2026-27′ सुरु असून अवघ्या 15 दिवसांत नांदेड परिमंडलातील 1335 ग्राहकांनी प्रत्यक्ष अर्ज करुन योजनेत सहभाग नोंदवला आहे. त्यापैकी 333 ग्राहकांनी 29.50 लाख रुपयांचा थकित वीजबिल भरणा केलेला आहे. थकबाकीत असणाऱ्या वीज ग्राहकांना अभय योजनेचा लाभ मिळवून देत त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी मुख्य अभियंता राजाराम माने मार्गदर्शनाखाली सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. 20 नोव्हेंबर 2026 रोजी पर्यंतच्या तपशीलानुसार नांदेड परिमंडलातील नांदेड जिल्ह्यात थकबाकीपोटी तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या 660 ग्राहकांनी योजनेत भाग घेतला. पैकी 150 ग्राहकांनी 9.58 लाख रुपयांचा भरणा केला.परभणी जिल्ह्यात 342 ग्राहकांचा सहभाग असून पैकी 88 ग्राहकांनी 14.34 लाख रुपयांचा तर हिंगोली जिल्ह्यात 333 जणांचा सहभाग असून पैकी 95 ग्राहकांनी 5.59 लाख रुपयांचा भरणा केलेला आहे. थकबाकीमुक्तीसाठी घसघशीत सवलतींचा समावेश असणाऱ्या अभय योजनेअंतर्गत एकूण थकबाकीमधील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार 100 टक्के माफ करण्यात येणार आहे. तर उर्वरित मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यात आणखी 20 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. यासह ग्राहकांच्या मागणीनुसार पुनर्जोडणीही तात्काळ मिळणार आहे. 31 मार्च 2026 पर्यंत ज्या उच्च व लघुदाब वर्गवारीमधील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे असे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर बिगरकृषी (शेती व सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना वगळून) ग्राहक तसेच दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक ‘अभय योजना 2026-27’ साठी पात्र आहेत. तसेच महावितरण डिस्ट्रीब्यूशन फ्रॅन्चाईजीमधील ग्राहकांनाही ही योजना लागू आहे. या योजनेत एकूण थकबाकीमधील संपूर्ण व्याजाची आणि विलंब आकाराची रक्कम 100 टक्के माफ करण्यात येईल. मूळ थकबाकीची रक्कम एकाच वेळी किंवा हप्त्यांनी भरण्याची ग्राहकांना सुविधा आहे. ही योजना सुरू झाल्यापासून 15 डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना ‘अर्ली बर्ड रिबेट’चा फायदा देण्यात येईल. यात लघुदाब घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना 3 वर्षांपर्यंत वीजजोडणी कायमस्वरूपी खंडित असल्यास 10 टक्के तर 3 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कायमस्वरुपी खंडित असल्यास 20 टक्के सवलत मिळेल. तसेच लघुदाब घरगुती व व्यावसायिक वगळून इतर सर्व लघु व उच्चदाब ग्राहकांना अनुक्रमे 10 टक्के व 15 टक्के सूट मिळेल. लघुदाब ग्राहकांना 50 टक्के डाऊन पेमेंट भरून उर्वरित रकमेसाठी 6 समान व्याजमुक्त मासिक हप्ते तर उच्चदाब ग्राहकांना थकबाकीनुसार व्याजमुक्त 3 ते 6 हप्त्यांची सुविधा उपलब्ध असेल. यासोबतच मंजूर भार 20 किलोवॉटपर्यंत आहे अशा ग्राहकांनी पुनर्जोडणीच्या वेळी ‘प्रीपेड स्मार्ट मीटर’चा पर्याय निवडल्यास मूळ थकबाकीमध्ये अतिरिक्त 5 टक्के सवलत दिली जाईल. उल्लेखनीय म्हणजे या योजनेत सहभागी सर्व ग्राहकांसाठी पुनर्जोडणी शुल्क आणि लघुदाब ग्राहकांसाठी सर्व्हिस कनेक्शन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. ‘अभय योजना 2026-27’ साठी अर्जाची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. महावितरणच्या ऑनलाइन पोर्टल किंवा मोबाईल अॅपद्वारे ग्राहक अर्ज करू शकतील. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *