![]()
कार्तिकी यात्रेनिमित्त वाखरी ( ता. पंढरपूर ) येथे भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात यंदा तेजी दिसून येत आहे, राज्यभरात दुष्काळाचे चित्र असताना वाखरीत जनावरांच्या बाजारात मात्र किमती प्रचंड वाढल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसात चार हजाराहून अधिक जनावरांची आवक झालेली असून खिलार गाय, बैलांसोबतच म्हशींच्या किमतीही लाखांच्या पटीत झालेल्या आहेत. यंदाच्या बाजारात सुमारे ४ लाखांची उलाढाल होईल असा अंदाज बाजार समितीकडून व्यक्त होत आहे. वाखरी येथील पालखी तळावर जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा बाजारात जनावरांची आवक आणि किमतीमध्ये तेजी दिसून येत आहे. शुक्रवारअखेर ४ हजार जनावरांची आवक झालेली आहे. यामध्ये खिलार गाय, बैल, पंढरपुरी म्हशी, रेडे यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. खिलार जनावरांच्या किमती १० हजारापासून २ ते अडीच लाखांपर्यंत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येते. तर म्हशींचीही आवक मोठी असून ५० हजारापासून म्हशींच्या किमती सुरु होतात. सर्वसाधारण म्हशींची किंमत १ लाख रुपये सांगितली जाते. तर प्रदर्शनात जाणाऱ्या, पहिल्या, दुसऱ्या वेताच्या पंढरपुरी म्हशींची विक्री ३ ते पाच लाख रुपयांना होत असल्याचे बाजारात दिसून आले. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा वाखरीचा जनावरांचा बाजार तेजीत दिसून येत आहे. उलाढाल दुप्पट होण्याचा अंदाज, गतवर्षी केवळ २ कोटी उलाढाल कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने यंदा बाजारात ३ ते ४ कोटी रुपयांची अर्थीक उलाढाल होण्याची शक्यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. शुक्रवार अखेर २ कोटी रुपयांची उलाढाल झालेली असून शनिवार आणि रविवार या अखेरच्या दिवसापर्यंत साडे तीन ते चार कोटी रुपयांपर्यंत आर्थिक उलाढाल होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील वर्षी संपूर्ण यात्रेत केवळ २ कोटी रुपयांची उलाढाल झालेली होती. एकलासपूरच्या ताड यांच्या १६ म्हशीचा तोरा एकलासपूर येथील पशुपालक शेतकरी विनायक औदूंबर ताड यांच्याकडील दुर्गा आणि तुफान या दोन म्हशींची साडे नऊ लाख रुपयांना मागणी करण्यात आली आहे. विनायक ताड यांच्याकडे पंढरपुरी जातीच्या १७ म्हशी आहेत. त्यापैकी १२ म्हशी त्यांनी वाखरी येथील बाजारात प्रदर्शनासाठी आणल्या होत्या. त्यापैकी २ वेताच्या तुफान आणि दुर्गा या म्हशींना साडे नऊ लाख रुपयांना मागणी आलेली होती. दोन्ही म्हशी दुभत्या असून एका वेळी ११ ते १२ लिटर दूध देत आहेत.
Source link
कार्तिकी यात्रा:वाखरीच्या बाजारात 4 हजार जनावरांची आवक, दुर्गा अन् तूफान म्हशींना 9.50 लाखांची मागणी