![]()
कुर्ला येथील फीनिक्स मॉल परिसरात तरुण-तरुणीला झालेल्या मारहाण प्रकरणाचे पडसाद आता प्रशासकीय कारवाईत उमटू लागले आहेत. या हल्ल्यातील अल्पवयीन मुले घाटकोपर (पश्चिम) येथील ज्या “मदरसा जामिया फातिमतुझ्झहरा’मधून आली होती त्या मदरशाच्या बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेच्या “एल’ विभागाने या मदरशाला कलम 488 अन्वये नोटीस बजावली असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. नारायणनगर परिसरातील गैबन शाह दर्गा रोड (प्रमोद महाजन उद्यानाच्या मागे) येथे हा मदरसा आहे. इमारत व कारखाने विभागाचे सहायक अभियंता पी. वाय. गोले यांनी जारी केलेल्या नोटीसनुसार, पालिकेचे पथक 25 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष जागेवर जाऊन बांधकामाची पाहणी व मोजमाप करणार आहे. तपासणीच्या वेळी बांधकाम अधिकृत असल्याचे सिद्ध करणारे मूळ मंजूर नकाशे, भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) आणि इतर परवानग्यांची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिकेने घाटकोपर पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. मुले याच मदरशात शिकत असल्याचे उघड प्रकरण काय?: फीनिक्स मॉलमध्ये तरुण व तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी विनोबा भावेनगर पोलिसांनी 8 अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला होता. ही मुले याच मदरशात शिकत असल्याचे पोलिस तपासात समोर आले. पुढे काय होणार? 25 नोव्हेंबरच्या मोजमापात हे बांधकाम अनधिकृत आढळल्यास किंवा मदरसा प्रशासनाला अधिकृत कागदपत्रे सादर करता न आल्यास पालिका कलम 351 अन्वये अंतिम नोटीस बजावून बांधकामावर थेट हातोडा चालवणार आहे. कुठल्याही बांधकामाची वैधता अशी तपासली जाते? कोणत्याही वास्तूचे बांधकाम अधिकृत की अनधिकृत ठरवण्यासाठी महापालिकेकडून मूळ मंजूर आराखडा आणि भोगवटा प्रमाणपत्राची तपासणी केली जाते. यामध्ये इमारतीची उंची, क्षेत्रफळ आणि जागेच्या वापराचा प्रकार (उदा. निवासी की शैक्षणिक) नियमानुसार आहे की नाही, याची मोजमाप करून खातरजमा केली जाते. तसेच अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि जागेच्या मालकी हक्काची कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असते. कलम 488 चा अर्थ मुंबई महापालिका कायद्याच्या कलम 488 नुसार, पालिका अधिकाऱ्यांना कोणत्याही इमारतीची तपासणी व मोजमाप करण्यासाठी जागेत प्रवेश करण्याचा कायदेशीर अधिकार मिळतो.
Source link
कुर्ला मारहाण प्रकरणात संबंधित मदरशास नोटीस:25 नोव्हेंबरला पोलिस बंदोबस्तात होणार पाहणी