Headlines

पंचगंगा साखर कारखान्यासमोर ठिय्या:वैजापूर-गंगापूर मार्गावर भंगूर फाटा येथे ऊस दरवाढीसाठी सहा तास रास्तो रोको, प्रतिटन 4200 रुपये दर देण्याची मागणी




ऊसाला प्रतिटन ४२०० रुपये भाव मिळावा, पहिली उचल ३९०० रुपये द्यावी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी (दि. २३) वैजापूर-गंगापूर मार्गावरील भंगूर फाटा येथे हजारो शेतकऱ्यांनी तब्बल सहा तास रास्ता रोको आंदोलन केले. पंचगंगा साखर कारखान्यासमोर झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी ऊसदराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली. अन्यायाविरुद्ध लढा संघटनेचे नेते अजय पाटील साळुंके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मराठवाडा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी कोल्हापूरच्या धर्तीवर ऊसाला दर द्यावा, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी होती. ऊस उत्पादनाचा खर्च सातत्याने वाढत असताना कारखान्यांकडून अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत असल्याची भावना आंदोलनात व्यक्त करण्यात आली. कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव देऊन आर्थिक न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी उसाच्या मोळ्या हातात घेऊन घोषणाबाजी केली. रस्त्यावर ठिय्या मांडत ऊसदरवाढीचा प्रश्न उपस्थित केला. या आंदोलनात प्रकाश ठुबे, बाळासाहेब जानराव, संतोष गोरे, अमोल गुंड, चंद्रशेखर साळुंखे, शांताराम चव्हाण, चंद्रकांत जानराव, रामकिसन ठेंगे यांच्यासह हजारो ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. रिकव्हरीच्या आधारे दर द्या मराठवाडा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कारखान्यांनी कोल्हापूरप्रमाणे ऊसदर द्यावा. साखर रिकव्हरीतील फरक लक्षात घेऊन दरनिश्चिती करावी. रिकव्हरीच्या आधारे शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ मिळावा. तसेच पहिली उचल ३९०० रुपये देऊन ऊस उत्पादकांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. तहसीलदारांना निवेदन सहा तासांच्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार सुनील सावंत यांना देण्यात आले. अन्यायाविरुद्ध लढा संघटनेचे नेते अजय पाटील साळुंके यांच्यासह शेतकरी प्रतिनिधींनी ऊसाला प्रतिटन ४२०० रुपये दर, पहिली उचल ३९०० रुपये आणि पाणी संपलेल्या उसाला प्राधान्याने तोड देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भंगूर फाटा येथे सहा तास खोळंबळी वाहतूक वैजापूर-गंगापूर मार्गावरील भंगूर फाटा येथे हजारो शेतकऱ्यांनी सहा तास रास्ता रोको केल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. पंचगंगा साखर कारखान्यासमोरील रस्त्यावर ऊस वाहतूक करणारी वाहने, ट्रॅक्टर आणि इतर वाहनांची गर्दी झाली होती. आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. ऊसदराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा फटका वाहतुकीला बसला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *